वाढते तापमान, जागे व्हा!

पृथ्वीवरील वातावरणात होत असलेला बदल हा एक चिंतेचा विषय आहे. पुढील पंधरा दिवसात जर पाऊस पडला नाही, तर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. यंदा उष्णतामान वाढले आणि पाऊस देखील कमी पडणार असा इशारा दिलेला आहे, यावर गांभीर्याने विचार व्हायला हवा. अद्याप वेळ गेलेली नाही. जागृत राहण्याचे काम आपले आहे.
मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही, परंतु पुढील दोन दिवसानंतर तो पोहोचेल, असा भारतीय हवामान खात्याचा अंदाज आहे. दरवर्षी एवढ्यात मान्सून केरळमध्ये सक्रिय झालेला असायचा आणि नंतर तो कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र असे करीत उत्तर भारतात पोहचायचा. यावर्षी उष्णतेची प्रचंड लाट आणि त्यातून अनेक गंभीर समस्या या देशात उद्भवल्या आहेत. सध्या देशातील अनेक जलाशयांमधील पाण्याचा साठा एकदमच खाली उतरलेला आहे. पुढील पंधरा दिवसात जर पाऊस पडला नाही, तर देशात गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. जागतिक पातळीवर तापमान वाढत आहे आणि आपण सर्वचजण त्याला जबाबदार आहोत. ‘ओझोन’ला मोठे विवर पडलेले आहे आणि त्यातून हवामानात प्रचंड बदल होत आहेत. गेल्या दोन दिवसात देशातील अनेक भागात जोरदार पाऊस पडला. त्यामुळे उष्णतेची लाट असलेल्या उत्तर भारतातील जनतेला थोडा दिलासा मिळाला. राजस्थानमधील जैसलमेर भागामध्ये प्रचंड धुळीचे वादळ निर्माण झाले. त्याचा फटका असंख्य नागरिकांना बसला. पृथ्वीतलावरील एकंदरीत वातावरणात होत असलेला बदल हा एक चिंतेचा विषय आहे. मोठ्या प्रमाणात वातानुकूलित यंत्रणेचा वापर आपण करतो. त्यातूनही एकंदरीतच वातावरणावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळेच उष्णता वाढत आहे. चक्रीवादळांची संख्या देखील वाढते. देशाचे एकंदरीत पर्यावरण हे बिघडत आहे. आज आपण जेव्हा अनेक थंड हवेच्या ठिकाणी जातो, त्या ठिकाणी पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, अनेक डोंगराच्या उतारावर बांधण्यात येत असलेली घरे, गरज नसताना वीज दिव्यांची वाढती रोषणाई, त्यातून पशुपक्षी झाडे यांच्यावर देखील होत असलेला परिणाम, यासर्वांतून देशाचे पर्यावरण बिघडत आहे. दरवर्षी साधारणत: 15 मे पर्यंत मान्सून अंदमानमध्ये दाखल होत असे. यंदा तो एक आठवडा पुढे गेला आणि केरळमध्ये साधारणत: 30 वा 31 मे पर्यंत येणारा मान्सून अद्याप पोहचलेला नाही. तो आणखी चार दिवसांनी उशिरा पोहोचेल, असे ज्यावेळी हवामान तज्ञ सांगतात आणि यावेळी ‘अल निनो’चा फटका बसणार असल्याने, यंदा पाऊस फारच कमी राहील असा इशाराच हवामान खात्याने दिलेला होता. पुढील दोन दिवसानंतर मान्सून केरळमध्ये पोहोचेल परंतु तो तिथे थोडा स्थिर झाल्यानंतरच कर्नाटकाच्या दिशेने पुढे सरकत राहील. हे सारे अंदाज आहेत. अलीकडे प्रदूषणाचे वाढते प्रमाण आणि त्यातून वाढत असलेले उष्णतामान यातून अनेक गंभीर समस्या निर्माण होत आहेत. वाढत्या उष्णतामानामुळे हिमाचलमधील बर्फ वितळू लागला. त्यातून गंगा नदीला येणारे पूर, मध्येच होत असलेली वादळे, या सर्व समस्या व घटना आपण पाहत आहोत. जागतिक पर्यावरण दिन येत्या पाच जून रोजी आहे. त्या दिवशी मंत्री, आमदार, राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते एक एक झाड लावतील आणि त्याचे फोटो प्रदर्शित करतील. प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल तसेच डोंगरकापणी आणि त्यातून बिघडत गेलेला समतोल हे पर्यावरणासाठी बाधक ठरत आहे. जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पर्यावरण संरक्षणासाठी हालचाली चालू आहेत. भारतात देखील फार काळजी घेणे गरजेचे आहे. अलीकडे आपणास अनेक समुद्रकिनारे प्लास्टिकच्या कचऱ्याने प्रदूषित झालेले दिसतात. समुद्र प्रदूषित होत आहे. समुद्रातून येणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे 40 टक्के कचरा हा प्लास्टिक कचरा आहे. यातून जलचरांवर केवढा विपरित परिणाम होत असेल, याचा आपण विचार करीत नाही. पर्यावरण राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते करीत नसल्यामुळेच आपण कर्तव्यापासून दूर जात आहे. साहजिकच तापमान वाढत आहे. गेल्या दहा वर्षाच्या तुलनेत यंदा पारा फार वाढलेला दिसतोय आणि हा पारा पुढील वर्षी आणखी वाढण्याची शक्यता तथा इशारा जागतिक पातळीवरून दिला जात आहे. यासाठीच पर्यावरण जतनाचा प्रयत्न शासकीय पातळीवर गांभीर्याने व्हावा. पर्यावरणास बाधा पोहोचवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे. दोन दिवसात एक अहवाल प्रकाशित झाला आणि त्यामध्ये भारतातील जवळपास सर्वच शहरे गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यावर्षी जास्त प्रकाशित आहेत. उपग्रहावरून पाहिल्यानंतर भारत हा जास्त विजेचा वापर करीत असल्याचे दिसून येते. वीज यंत्रणेचा वापर केला म्हणून हरकत नाही, परंतु गरजेच्या पलीकडे जाऊन वीज दिवे लावल्याने रात्रीचा अंधार कमी होतोय आणि सर्वत्र प्रकाशमय वातावरण दिसते. त्याचा पशु पक्षांवर, झाडांवर आणि फुलांवर देखील विपरित परिणाम होत आहे.
Source link



