फोन्सेका, व्हेरेव्ह, जोदार, स्नायडर उपांत्यपूर्व फेरीत

कास्पर रुड, मॅडिसन किज, बुस्टा, पोटापोव्हा पराभूत
वृत्तसंस्था, पॅरिस
2026 च्या फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये ब्राझीलचा नवोदित जोआव फोन्सेकाने नॉर्वेच्या कास्पर रुडचा पराभव करत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तसेच जर्मनीच्या द्वितीय मानांकीत अॅलेक्झांडर व्हेरेव्ह, स्पेनचा राफेल जॉडर यांनीही शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. महिलांच्या विभागात स्नायडर, श्वालिन्स्का यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. दुहेरीमध्ये भारताच्या बालाजीने डिमोलीनेसमवेत चौथी फेरी गाठली आहे.
पुरूष एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात ब्राझीलच्या फोन्सेकाने नॉर्वेच्या 15 व्या मानांकीत कास्पर रुडचे आव्हान 7-5, 7-6 (8-6), 5-7, 6-2 अशा चार सेट्समधील लढतीत संपुष्टात आणले. 19 वर्षीय फोन्सेकाने पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. त्याने या स्पर्धेतील तिसऱ्या फेरीत सर्बियाच्या माजी टॉपसिडेड जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता. आता त्याचा पुढील सामना झेकच्या जेकुब मेन्सीकबरोबर होणार आहे.
पुरूष विभागातील चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात जर्मनीच्या अॅलेक्झांडर व्हेरेव्हने हॉलंडच्या जेस्पर डी. जाँगचा 7-6 (7-3), 6-4, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. 29 वर्षीय व्हेरेव्ह आता पहिले ग्रँडस्लॅम जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्पर्धेमध्ये इटलीचा टॉपसिडेड जेनिक सिनर, जोकोविच, रुड यांचे आव्हान संपुष्टात आल्याने व्हेरेव्हला जेतेपदाची निश्चितच संधी उपलब्ध झाली आहे. दुखापतीमुळे स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने आपला सहभाग दर्शविला नाही. व्हेरेव्हचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना स्पेनच्या राफेल जॉडरशी होणार आहे. स्पेनच्या नवोदित 19 वर्षीय राफेल जॉडरने अनुभवी स्पेनच्या पाबेलो कॅरेनो बुस्टाचे आव्हान 4-6, 4-6, 6-1, 6-2, 6-2 अशा पाच सेटमध्ये संपुष्टात आणले.
महिला एकेरीच्या चौथ्या फेरीतील सामन्यात कॅलिन्स्कायने पोटापोव्हाचा 6-4, 2-6, 7-6 (10-7) असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या मॅडीसन किजचे आव्हान चौथ्या फेरीत समाप्त झाले. स्नायडरने मॅडिसन कीजचा 6-3, 3-6, 6-0 असा फडशा पाडला. श्वालिन्स्काने पॅरीचे आव्हान 6-3, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये संपुष्टात आणत शेवटच्या 8 खेळाडूंत स्थान मिळविले.
भारताच्या एन. बालाजी आणि डिमोलीनेर या जोडीने पुरुष दुहेरीची चौथी फेरी गाठताना पिट्झ आणि क्राविएत्झ यांचा 7-5, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
Source link



