राज्यातील धरणांमधील जलसाठा अर्ध्यापेक्षा कमी

पावसाला उशीर झाल्यास पाणी टंचाई निर्माण होण्याची भीती
पणजी : पावसाचा प्रत्यक्ष हंगाम सुरु होण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असताना राज्यातल्या पाच प्रमुख धरणांतील पाण्याचा साठा अर्ध्यापेक्षा कमी झाल्याचे समोर आले आहे. पावसाळा वेळेवर सुरु झाला तर समस्या निर्माण होणार नाही तथापि पावसाला उशीर झाला तर मात्र पाणी टंचाई होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. गोवा राज्यात 7 जूनपासून पाऊस सुरु होतो. काही दिवस मागे – पुढे होतात पण तो वेळेवर येणे गोव्यासाठी आवश्यक बनले आहे.
पेयजल खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवाडी धरणात 42 टक्के पाणीसाठा आहे तर साळावली धरणामध्ये 47 टक्के पाणी शिल्लक आहे. तिळारी धरणात 45 टक्के पाणीसाठा असून आमठाणे धरण 43 टक्केच पाण्याने भरलेले आहे. अंजुणे धरणाची पाणी पातळी 30 टक्के कमी झाली असून वरील सर्व धरण क्षेत्रात पाऊस लवकर पडणे आवश्यक आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. एप्रिल – मे महिन्यात पाणी साठ्याचा आढावा पेयजल खात्यातर्फे घेण्यात येतो. त्यानुसार पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली.
पर्यायी व्यवस्था…
गवाणे आणि चापोली धरणात चांगला पाणीसाठा आहे. पावसाला उशीर झाला तर पर्यायी व्यवस्था करण्यात येणार असून आमठाणे धरणात तिळारीचे पाणी सोडले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
Source link



