Uncategorized

व्हीबी-जी राम जी अंतर्गत अखंड रोजगार द्या

जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची सूचना : व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अधिकाऱ्यांची बैठक

प्रतिनिधी

बेळगाव

व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व ग्रा. पं. तींच्या हद्दीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नसल्याने ग्रामीण भागातील मजुरांना रोजगाराची गरज निर्माण झाली आहे. ग्रा. पं. कार्यक्षेत्रात मंजूर विकासकामे उपलब्ध नसल्यास किमान पाच नवीन कामांचा कृती आराखडा तयार करून तातडीने जि. पं. कडे सादर करावा. अशा प्रस्तावांना प्राधान्याने मंजुरी दिली जाईल. त्यामुळे सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून मजुरांना अखंड रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी दिल्या.

जि. पं. कार्यालयातील सभागृहात सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित व्हीबी-जी राम जी योजनेच्या प्रगतीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. शिंदे म्हणाले, ग्रामीण भागात दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता दुष्काळ निवारण आणि व्यवस्थापनाशी संबंधित कामांना प्रथम प्राधान्य द्यावे. योजनेतून सातत्याने रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच कायमस्वरुपी उपजीविकेला हातभार लावणारी विकासकामे हाती घ्यावीत. तसेच योजनेची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृती कार्यक्रमही राबवावेत, अशी सूचनाही त्यांनी दिली.

व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत एकूण 318 प्रकारची विकासकामे हाती घेण्याची तरतूद आहे. यामध्ये जलसंधारण, ग्रामीण पायाभूत सुविधा, उपजीविका विकास, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन तसेच इतर विकासकामांचा समावेश आहे. या संधीचा प्रभावी उपयोग करून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध पद्धतीने कामे राबवावीत, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामीण भागातील गोमाळ क्षेत्रांची ओळख पटवून जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय सेवा, वन विभाग आणि कृषी विभागाकडून मंजूर करण्यात आलेली कामे तातडीने सुरू करून अधिकाधिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा. तसेच शिक्षण, महिला व बालकल्याण, आरोग्य, कृषी, उद्यान, वन आणि पशुसंवर्धन आदी विविध विभागांशी संबंधित विकासकामेही व्हीबी-जी राम जी योजनेंतर्गत राबविता येणार असल्याने सर्व विभागांनी समन्वय साधून प्रभावी नियोजन करावे, असेही शिंदे यांनी सांगितले.

यावेळी योजना संचालक रवी बंगारप्पनवर, कृषी विभागाचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, वनविभागाचे सहसंचालक महांतेश मुरगोड, महिला व बालकल्याण विभागाचे उपसंचालक चेतनकुमार, डीडीपीआय लिलावती हिरेमठ, जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. ईश्वर गडाद, उपवनसंरक्षक राजेश्वरी इरनट्टी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​