योगाभ्यास पूर्ण झालेला योगी आत्म्याशी निगडित झालेला असतो

भगवंत म्हणाले, ज्या योग्याची आसनसिद्धी होते त्याची कुंडलिनी वज्रासनाच्या उष्णतेने जागृत होते, प्राण आणि अपान रोखले जाऊन शरीरशुद्धी होते, सर्व शरीरात नवचैतन्याचा उदय होतो, शरीर तेजस्वी दिसू लागते. पिंडाने शरीराचा ग्रास करणे म्हणजे पंचमहाभूतांनी पंचमहाभूतांचा लय करणे होय. हे आदिनाथ शंकर यांच्या अंतरंग खुणेचे मर्म श्रीविष्णुने दाखवून दिले. कुंडलिनीचे तेज जेव्हा लय पावते, तेव्हा देहाचा आकार नाहीसा होऊन देह वायुरूप होतो. तेव्हा त्यास खेचर म्हणजे गगनविहारी असे म्हणतात. योगी जात असताना पावलापावलावर आणिमादिक सिद्धी उत्पन्न होतात पण योग्याला त्यांच्याशी काहीच देणेघेणे नसल्याने त्याच्या हातून होणारे चमत्कार त्याच्याही नकळत होत असतात. योग्याच्या देहातच तीनही भूतांचा लोप होतो पण कुंडलिनी जोपर्यंत शिवाशी एकरूप होत नाही, तोपर्यंत तिची शक्ती कार्यरत असते. त्यामुळे ती टाळ्यावरती काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करून मग र्मूध्न्याकाशरूपी पर्वतावर जाऊन राहिली की, योग्याचा योगाभ्यास पूर्ण होतो.
पुढील श्लोकात भगवंत म्हणतात, योगाभ्यास पूर्ण झालेला योगी मनावर ताबा मिळवून आत्म्याशी निगडित झालेला असतो. त्याची मन:शांती त्याला मोक्ष मिळवून देते आणि शेवटी तो माझ्यात येऊन मिसळतो
असे आत्म्यास जोडूनि योगी आवरिला मने । मोक्षास भिडली शांति माझ्या ठाई चि मेळवी ।। 15 ।।
&ं श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, जागृत झालेली योग्याची कुंडलिनी शक्ती त्याचा अभ्यास पूर्ण झाल्यामुळे ब्रह्मरंध्राचे ठिकाणी स्वस्थ होऊन ‘ते ब्रह्म मी आहे’ या भावनेने परब्रह्मरूपी लिंगाशी ऐक्य पावते. त्यामुळे पंचमहाभूतांचा पडदा नाहीसा झाल्याने शक्ती आणि परमात्मा यांचे ऐक्य होते. त्या ऐक्यात मूर्ध्निआकाशासकट सगळ्यांचा लय होतो. मेघांच्या मार्फत समुद्रापासून वेगळे झालेले समुद्राचे पाणी नदीच्या ओघात पडून, नदीच्या रूपाने पुन्हा समुद्रास मिळते, त्याप्रमाणे शरीराच्या द्वारे शक्तिरूप टाकून शिवच शिवात मिसळतो असे म्हणता येईल. शिव आणि शक्ती हे द्वैत होते की, एकच होते असा विचार करण्यापुरतीही जागा उरत नाही. गगनी गगन लया जाये अशी जी काही स्थिती आहे, ती अनुभवाने प्राप्त होते. ही स्थिती शब्दाने सांगता येत नसल्याने समजावून सांगता येत नाही. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात भगवंतांनी
आश्चर्य जो साच चि ह्यास देखे । आश्चर्य जो देखत ह्यास वर्णी ।आश्चर्य जो वर्णन ते हि ऐके । ऐके तरी शून्य चि जाणण्याचे ।। 29 ।। असे आत्म्याविषयी केलेले वर्णन ब्राह्मस्वरुपालाही लागू आहे.
असं जरी असलं तरी त्यात काय विशेष, ही स्थिती कशी असते ते मी सांगतो असे गर्वाने कुणी म्हणेल तर निश्चित समजावे की, ती व्यक्ती ह्या ब्रह्मस्थितीपासून फार दूर आहे. अर्जुना मी सांगितलेल्या अष्टांगयोगरूपी साधनाला ज्यांनी त्यांचे शरीर अर्पण केले ते योगाभ्यासाने शुद्ध झाल्यावर माझ्या बरोबरीला येतात. त्यांचे शरीर म्हणजे देहाकृतीच्या मुशीत परब्रह्मरस ओतून तयार केलेली माझीच मूर्तीच होय. जो हा अनुभव घेतो त्याला सर्व जग ब्रह्मव्याप्त असल्याची प्रचीती येत असल्याने त्याच्या दृष्टीने जगाचे अस्तित्व नाहीसे होते.
क्रमश:
Source link



