योगमार्गरुपी कड्यावर चढताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते

अध्याय सहावा
ह्या अध्यायात भगवंत योगमार्गाचे विवेचन करत आहेत. ते म्हणाले, अर्जुना, संन्यासी आणि कर्मयोगी ह्यांच्यातील फरकच सांगायचा झाला तर संन्यासी कर्मफलाचा त्याग करतो तर कर्मयोगी फळाची अपेक्षाच करत नाही म्हणून संन्यास व कर्मयोग एकच असं म्हणायला हरकत नाही. योगी होणं फार अवघड आहे कारण प्रत्येकाला केलेल्या कर्माच्या फळाची अपेक्षा असतेच आणि योगी होण्यासाठी फळाची अपेक्षा करायची नाही हे पहिलं पथ्य आहे. त्यामुळे ज्याचा कर्मफलाविषयीचा संकल्प सुटला नाही असा कोणीही मनुष्य योगी होत नाही. ज्याने कर्म करून मिळणाऱ्या फळातून मी अमूक साध्य करीन असे संकल्प करण्याचे थांबवले आहे, त्यालाच योगाचे सर्वस्व म्हणजे ब्रह्म प्राप्त होते. ज्याला ब्रह्मप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्याने त्यासाठी कर्म हे साधन आहे हे लक्षात ठेवावे. ज्याला ब्रह्म प्राप्त होईल त्याला तेथे स्थिर होण्यासाठी शम हे साधन सांगितले आहे. ह्या अर्थाचा योगावरी चढू जाता कर्म साधन बोलिले । योगी आरूढ तो होता शम साधन बोलिले ।। 3 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. योगरूपी पर्वताची चढण अत्यंत कठीण असते. ज्या पर्वताची चढण अत्यंत कठीण असते त्या पर्वतावर चढण्यासाठी पायऱ्या तयार केलेल्या असतात. योगरुपी पर्वतावर चढण्यासाठी कर्मरुपी पायऱ्या तयार केलेल्या आहेत. पर्वतावर जेथपर्यंत माणसांचा नियमित वावर असतो तेथपर्यंतच पायऱ्या तयार केलेल्या असतात. पुढे फार कमी लोकांचा वावर असल्याने त्यांच्या जाण्यायेण्याने पाऊलवाट तयार झालेली असते. ज्याला योगरुपी पर्वताच्या शिखरावर चढून जायचे असेल त्याने या कर्मरूपी पायऱ्यांच्या चढणीने सुरूवात करावी. त्यासाठी प्रथम निरपेक्षपणे कर्म करायला प्रारंभ करावा. पुढे अष्टांग योगातील यमनियमांची पाऊलवाट लागते. ह्या यमनियमरूपी पाऊल वाटेवरून मनुष्य आसनाच्या पायवाटेवर येतो आणि त्या पायवाटेने प्राणायामाचा कडा चढून योगरूपी पर्वताच्या मध्यावर पोहोचतो.
माउली पुढे म्हणतात, पुढील चढण आणखी बिकट होत जाते. त्यात नंतर प्रत्याहाररुपी तुटलेला कडा लागतो. प्रत्याहारात साधकाने इंद्रिये सुचवतील त्या गोष्टी करायचे टाळून आपल्याला जे हवे ते आणि तेव्हढेच त्यांनी सुचवावे अशा बेताने त्यांना ताब्यात ठेवायचे असते. मनात जे विविध विचार येतात त्याला अनुसरून इंद्रिये आपल्याला विविध गोष्टी सुचवून आपलं मन भरकटवत असतात. म्हणून ह्या टप्प्यावर माणसाने निरिच्छ व्हावे व कोणत्याही गोष्टीबाबत मनात विचार येणे थांबवावे. अर्थातच ही फार अवघड बाब असल्याने त्या निसरड्या कड्यावर बुद्धीचेही पाय ठरत नाहीत. अशावेळी कठोरातल्या कठोर आचरणाबाबत प्रसिद्ध असलेल्या हटयोग्यांनाही शेवटी त्यांच्या प्रतिज्ञा सोडून द्याव्या लागतात. ही चढाई यशस्वी करण्यासाठी माउली अभ्यासाचा मार्ग सुचवतात. अपयश आले म्हणून निराश न होता साधकाने अभ्यास म्हणजे चुकांची दुरुस्ती करत करत पुन्हा प्रयत्न करणे. प्रत्याहाररुपी कडा सर करण्यासाठी निरिच्छ होणे आवश्यक असते. माउली म्हणतात प्रत्याहाररुपी कड्याची चढण खडी असल्याने त्यात हात वारंवार घसरतात ते टाळण्यासाठी वैराग्यरुपी नख्या त्यात रुतवाव्यात.
Source link


