Uncategorized

आरसीबीसमोर दिल्लीचे सपशेल लोटांगण

दिल्लीचा 75 धावांत खुर्दा, सामनावीर हॅझलवूड-भुवनेश्वर कुमार यांचे सात बळी

वृत्तसंस्था, दिल्ली

2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा 9 गड्यांनी दणदणीत पराभव करून गुणतक्त्यात 12 गुणांसह दुसरे आपले दुसरे स्थान कायम राखले. 12 धावांत 4 गडी बाद करणाऱ्या हॅझलवूडला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.

आरसीबीने नाणेफेक जिंकून दिल्ली कॅपिटल्सला प्रथम फलंदाजी दिली. भुवनेश्वर कुमार आणि हॅझलवूड यांच्या भेदक माऱ्यासमोर दिल्ली कॅपिटल्सचे फलंदाज साफ कोलमडले. अभिषेक पोरेल आणि काइल जेमिसन तसेच डेव्हिड मिलर यांच्या थोड्याफार प्रतिकारामुळे दिल्लीला 75 धावांपर्यंत मजल मारता आली. 16.3 षटकांत दिल्लीचा डाव 75 धावांत आटोपला. त्यानंतर आरसीबीने 6.3 षटकांत 1 बाद 77 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी एकतर्फी जिंकला.

दिल्लीच्या डावामध्ये भुवनेश्वर कुमारने पहिल्याच षटकातील दुसऱ्याच चेंडूवर साहील पारखचा खाते उघडण्यापूर्वी त्रिफळा उडविला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर हॅझलवूडने केएल राहुलला केवळ एका धावेवर शर्माकरवी झेलबाद केले. हॅझलवूडने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर समीर रिझवीला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद केले. भुवनेश्वर कुमारने आपल्या दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर स्टब्जला पडिक्कलकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 5 धावा केल्या. भुवनेश्वरने आपल्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलला खाते उघडण्यापूर्वी शर्माकरवी झेलबाद केले. दिल्लीची यावेळी स्थिती 2.4 षटकांत 5 बाद 7 अशी केविलवाणी होती. हॅझलवूडने नितीश राणाला 1 धावेवर झेलबाद केले.

डेव्हिड मिलर आणि अभिषेक पोरेल यांनी सातव्या गड्यासाठी 35 धावांची भागिदारी केली. रसिख सलामने मिलरला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 3 चौकारांसह 19 धावा केल्या. जेमिसन पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 12 धावा केल्या. सुयश शर्माने कुलदीप यादवचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. एका बाजुने धावा वाढविण्यासाठी प्रयत्न करणारा अभिषेक पोरेल हॅझलवूडच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 33 चेंडूत 3 चौकारांसह सर्वाधिक 30 धावा जमविल्या. दिल्लीचा डाव 16.3 षटकांत 75 धावांत आटोपला. आरसीबीतर्फे हॅजलवूडने 12 धावांत 4 तर भुवनेश्वरकुमारने 5 धावांत 3 तसेच कृणाल पांड्याने, सुयश शर्मा आणि रसिख सलाम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्लीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 12 धावांत 6 गडी गमविले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीच्या डावात बेथेल आणि विराट कोहली या सलामीच्या जोडीने 17 चेंडूत 26 धावांची भागिदारी केली. तिसऱ्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर जेमिसनने बेथेलला झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविल्या. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य 51 धावांची भागिदारी करत आपल्या संघाला 9 गड्यांनी विजय मिळवून दिला. पडिक्कलने 13 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 34 तर विराट कोहलीने 15 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 23 धावा जमविल्या. आरसीबीच्या डावात 7 षटकार आणि 5 चौकार नोंदविले गेले. दिल्लीतर्फे जेमिसनने 1 गडी बाद केला. आरसीबीने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 65 धावा जमविताना 1 गडी गमविला.

संक्षिप्त धावफलक: दिल्ली कॅपिटल्स 16.3 षटकांत सर्वबाद 75 (अभिषेक पोरेल 30, डेव्हिड मिलर 19, जेमिसन 12, अवांतर 4, हॅझलवूड 4-12, भुवनेश्वरकुमार 3-5, कृणाल पांड्या, सुयश शर्मा व रसिख सलाम प्रत्येकी 1 बळ), आरसीबी 6.3 षटकांत 1 बाद 77 (बेथेल 20, कोहली नाबाद 23, पडिक्कल नाबाद 34, जेमिसन 1-42)


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​