मे मध्ये द्यावे लागणार दोनवेळा बायोमेट्रीक

रेशनकार्डधारकांना या महिन्यात केंद्राचा तर जून महिन्यात मिळणार राज्य सरकारचा तांदूळ
बेळगाव : केंद्र सरकारकडून मे आणि जून महिन्याचा तांदूळ साठा पुरविण्यात आला आहे. त्यामुळे मे आणि जून या दोन्ही महिन्याचा तांदूळ याच महिन्यात वितरीत केला जाणार आहे. यासाठी रेशनकार्डधारकांना दोनवेळा बायोमेट्रीक देणे बंधनकारक आहे. अंत्योदय रेशनकार्डधारकांना माणसी 70 किलो तर बीपीएल रेशनकार्डधारकांना माणसी 10 किलो तांदूळ वितरीत केला जाणार आहे. जून महिन्यातदेखील याच पद्धतीने दोनवेळा बीपीएल कार्डधारकांना बायोमेट्रीक द्यावे लागणार असून अन्नभाग्य योजनेंतर्गत माणसी 10 किलो तांदूळ वितरीत केला जाणार आहे.
विधानसभा निवडणूक काळात काँग्रेस सरकारकडून प्रती माणसी 10 किलो तांदूळ दिला जाईल, असा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. काँग्रेस पक्ष सत्तेत आल्यानंतर पंचहमी योजना टप्प्याटप्प्याने जारी करण्यात आल्या. त्याचप्रमाणे अन्नभाग्य योजनेंतर्गत बीपीएल कार्डधारकांना प्रती माणसी 10 किलो तर अंत्योदय रेशनकार्डधारकांना माणसी 35 किलो तांदूळ देणे शक्य झाले नाही. त्यामुळे अतिरिक्त तांदूळ पुरवठा केंद्र सरकारकडून करण्यात यावा यासाठी पाठपुरावा करण्यात आला. पण केंद्राकडून तांदूळ पुरविण्यास नकार देण्यात आला.
त्यामुळे मध्यंतरी काही महिने रेशनकार्डधारकांना केवळ 5 किलो तांदूळ तर उर्वरीत 5 किलो तांदळाच्या मोबदल्यात डीबीटीच्या माध्यमातून बँक खात्यात पैसे जमा केले जात होते. पैशाऐवजी तांदूळ देण्यात यावा, अशी मागणी रेशन दुकानदारांनी राज्य सरकारकडे लावून धरली होती. त्यानुसार फेब्रुवारी 2025 पासून 10 किलो तांदूळ वितरीत केला जात आहे. दरमहा 5 किलो केंद्र सरकार तर 5 किलो राज्य सरकारकडून असा एकूण 10 किलो तांदूळ प्रती माणसी दिला जात आहे. मात्र यावेळी केंद्र सरकारने जून महिन्याचा तांदूळ साठा अॅडव्हान्स मे महिन्यातच पुरविला आहे.
त्यामुळे मे महिन्यात दोन्ही महिन्याचा तांदूळ एकाचवेळी वितरीत केला जाणार आहे. राज्य सरकारच्या अन्नभाग्य योजनेचा तांदूळ मे महिन्यात दिला जाणार नसून जून महिन्यात मे महिन्याचा तांदूळ दिला जाणार आहे. त्यामुळे रेशनकार्डधारकांना जून महिन्यातही दोनवेळा बायोमेट्रीक द्यावे लागणार आहे. जून महिन्यात मे महिन्याचाही तांदूळ मिळणार असल्याने बीपीएल रेशनकार्डधारकांना प्रती माणसी 10 किलो तांदूळ वितरीत होणार आहे.
मे आणि जून महिन्यात दोनवेळा बायोमेट्रीक घ्यावे लागणार असल्याने याचा ताण रेशनदुकानदारांवर पडणार आहे. या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीने रेशन वितरण करावे याबाबत माहिती देण्यासाठी राणी चन्नम्मानगर येथील गोडावूनमध्ये रेशनदुकानदारांची बैठक दि. 8 रोजी आयोजित केली होती. त्यावेळी दुकानदारांना अन्न व नागरी खात्याचे साहाय्यक संचालक ईश्वर दयण्णावर, आहार निरीक्षक सचिन शिवण्णावर व रेशनदुकानदार संघाचे राज्य उपाध्यक्ष राजशेखर तळवार यांनी मार्गदर्शन केले.
ग्राहकांना पावती देणे आता बंधनकारक
रेशनचे वितरण करताना ग्राहकांना त्याची पावती देणे आता बंधनकारक असणार आहे. त्यामुळे रेशनदुकानदारांना थर्मल प्रिंटर घ्यावे लागणार आहे. टप्प्याटप्प्याने रेशनदुकानदारांकडून थर्मल प्रिंटर खरेदी केले जाईल, असे शुक्रवारच्या बैठकीत सांगण्यात आले. त्यामुळे यापुढे रेशनकार्डधारकांना रेशन घेतल्यानंतर त्याची पावती मिळणार आहे.
Source link



