महिला टी-20 विश्वचषक : न्यूझीलंडचा स्कॉटलंडवर विजय

इझी शार्प सामनावीर, हॅलीडेची नाबाद खेळी, मेली केरचे 3 बळी, डार्सी कार्टरचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था, ब्रिस्टॉल
आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या गट 2 मधील सामन्यात न्यूझीलंडने स्कॉटलंडचा 10 चेंडू बाकी ठेवून 6 गड्यांनी पराभव केला. या सामन्यात 43 चेंडूत 62 धावा जमविणाऱ्या न्यूझीलंडच्या इझी शार्पला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. स्कॉटलंडच्या डार्सी कार्टरचे नाबाद अर्धशतक वाया गेले.
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून स्कॉटलंडला प्रथम फलंदाजी दिली. स्कॉटलंडने 20 षटकांत 7 बाद 131 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंडने 18.2 षटकांत 4 बाद 132 धावा जमवित विजय मिळविला. या विजयामुळे न्यूझीलंडला 2 गुण मिळाले.
स्कॉटलंडच्या डावात सलामीच्या डार्सी कार्टरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 52 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 72 धावा झळकविल्या. फ्रेजर समवेत तिने सलामीच्या गड्यासाठी 43 चेंडूत 51 धावांची भागिदारी केली. सारा ब्राईसने 22 चेंडूत 3 चौकारांसह 25 तर चटर्जीने 12 चेंडूत 1 चौकारांसह 12 धावा जमविल्या. स्कॉटलंडच्या डावात 1 षटकार आणि 13 चौकार नोंदविले गेले. स्कॉटलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 45 धावा जमविल्या. 14 षटकाअखेर स्कॉटलंडने 2 बाद 96 धावांपर्यंत मजल मारली होती. कार्टरने 37 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. न्यूझीलंडतर्फे मेली केरने 17 धावांत 3, सोफी डिव्हाईनने 19 धावांत 2 तर ताहुहू व नेन्सी पटेल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंडच्या डावात सलामीची फलंदाज आणि अष्टपैलू मेली केर केवळ 2 धावांवर बाद झाली. त्यानंतर गेझने 17 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. सोफी डिव्हाईन स्लेटरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. तिने 1 धावा जमविली. न्यूझीलंडची यावेळी स्थिती 5.1 षटकांत 3 बाद 26 अशी केविलवाणी होती. शार्प आणि हॅलिडे यांनी चौथ्या गड्यासाठी 101 धावांची शतकी भागिदारी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. शार्पने 43 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 62 तर हॅलिडेने 38 चेंडूत 3 चौकारांसह नाबाद 41 धावा जमविल्या. ग्रीन 4 धावांवर नाबाद राहिली. न्यूझीलंडच्या डावात 1 षटकार आणि 14 चौकार नोंदविले गेले. न्यूझीलंडने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 31 धावा जमविताना 3 गडी गमविले. शार्पने 38 चेंडूत 7 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तर शार्प आणि हॅलिडे यांनी शतकी भागिदारी 74 चेंडूत नोंदविली. स्कॉटलंडतर्फे ब्राईस आणि स्लेटर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: स्कॉटलंड 20 षटकांत 7 बाद 131 (कार्टर नाबाद 72, सारा ब्राईस 25, चटर्जी 12, अवांतर 6, मेली केर 3-17, डिव्हाईन 2-19, नेन्सी पटेल व ताहुहू प्रत्येकी 1 बळी), न्यूझीलंड 18.2 षटकांत 4 बाद 132 (इझी शार्प 62, हॅलिडे नाबाद 41, गेझ 16, अवांतर 6, कॅथरिन ब्राईस आणि स्लेटर प्रत्येकी 2 बळी).
Source link



