भारत-बांगलादेश महिलांची आज उपांत्य लढत

भक्कम फलंदाजी व भेदक गोलंदाजीमुळे भारताचे पारडे जड, मात्र बांगलादेशकडून कडवा प्रतिकार अपेक्षित
वृत्तसंस्था, दुबई
गुरुवारी येथे होणाऱ्या महिला आशिया चषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत सातवेळा विजेतेपद पटकावणारा भारत आणि जिगरबाज बांगलादेश संघ आमनेसामने असतील. या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी मैदानावरील तीव्र चुरस आणि त्यामागील राजकीय पार्श्वभूमीमुळे हा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
बांगलादेशातील राजकीय सत्तांतरामुळे नवी दिल्ली आणि ढाका यांच्यातील राजनैतिक संबंधांत तणाव आला आहे. यापूर्वीही या दोन शेजारी देशांमधील तणावाचे पडसाद अनेकदा क्रिकेटच्या मैदानावर उमटले आहेत आणि हा कल पुढेही कायम राहण्याची शक्यता आहे. राजकीय तणावामुळे भारतीय पुरूष संघाचा बांगलादेश दौराही अनेकदा पुढे ढकलण्यात आला आहे.
क्रेकेटचा विचार करता हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने या स्पर्धेत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले आहे. गट अ मधील सर्व सामने जिंकून संघाने अव्वल स्थान पटकाविले असून आणखी एका विजेतेपदाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत. स्पर्धेतील भारताची कामगिरी अत्यंत प्रभावी राहिली आहे. विशेषत: पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यातील एकतर्फी विजयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात भारताने पाकिस्तानला अवघ्या 55 धावांत गुंडाळले आणि नंतर सात गडी राखून सहज विजय मिळवला.
भारताची भक्कम फलंदाजी फळी
भारताची फलंदाजी फळी अत्यंत भक्कम दिसत आहे. स्पर्धेतील आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे स्मृती मानधना प्रचंड आत्मविश्वासासह या महत्त्वाच्या सामन्यात उतरत आहे. हाँगकाँगविरुद्ध तिने 64 चेंडूत केलेल्या आक्रमक 124 धावांनी तिला आधुनिक काळातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून अधिक ठळकपणे प्रस्थापित केले आहे. या अनुभवी खेळाडूच्या जोडीला आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा हिनेही धडाकेबाज सुरूवात करून दिली आहे. शेफालीने नुकताच महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावांचा टप्पा गाठणारी सर्वात तरूण आणि जलद खेळाडू होण्याचा मान मिळवला असून तिने पॉवरप्लेमध्येच प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव निर्माण केला आहे. कर्णधार हरमनप्रीत आणि आक्रमक फटकेबाजी करणारी यष्टीरक्षक-फलंदाज रिचा घोष यांच्यामुळे मधली फळी स्थिरतेसोबतच डावाच्या उत्तरार्धात आक्रमक फलंदाजीची ताकदही प्रदान करते.
भारताचा प्रभावी गोलंदाजी मारा
गोलंदाजीचा विचार करता भारताकडे विविधतेचा आणि पर्यायांचा मोठा साठा उपलब्ध आहे. सतत चांगली कामगिरी करणारी दीप्ती शर्मा जिने नुकतेच महिलांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज म्हणून विक्रम प्रस्थापित केला आहे. ती राधा यादव आणि श्री चरणी यांच्या चतुर गोलंदाजीतील विविधतेच्या जोडीला प्रतिस्पर्धी फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवत आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणारी रेणुका सिंग नवीन चेंडूने अत्यंत घातक ठरली आहे. तिने सुरुवातीच्या टप्प्यातच बळी मिळवून प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढण्याची फारशी संधी दिलेली नाही.
बांगलादेशचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास
याउलट, बांगलादेशचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास जिद्दीचा राहिला आहे. कारण त्यांच्याकडे भारतासारखे निर्विवाद वर्चस्व नव्हते. निगार सुलतानाच्या संघाने संयुक्त अरब अमिरातीवर 34 धावांनी विजय मिळवून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. मात्र या सामन्यात त्यांची फलंदाजीतील कमकुवत बाजुही समोर आली, तेंव्हा त्यांची अवस्था 55 धावांत 6 बाद अशी झाली होती. त्यानंतर शर्मिन अख्तर आणि खुद्द कर्णधार निगार सुलताना यांच्या जिद्दी खेळींमुळे संघाने सावरत चांगली धावसंख्यरा उभारली. स्पर्धेतील बलाढ्या संघाला आव्हान देण्यासाठी भारताच्या अचूक वेगवान आणि फिरकी गोलंदाजीसमोर बांगलादेशच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. भारताच्या आक्रमक फलंदाजांना रोखण्यासाठी राबेया खान, नाहिदा अख्तर आणि मारुफा अख्तर यासारख्या गोलंदाजांना अत्यंत शिस्तबद्ध आणि सर्वोत्तम गोलंदाजी करावी लागेल.
जरी इतिहास आणि सध्याचा फॉर्म भारताच्या बाजूने झुकलेला असला आणि भारतीय संघाने या स्पर्धेत वर्चस्व गाजवले असले तरी या प्रकारच्या क्रिकेटमध्ये अनिश्चितता असते. त्यामुळे हरमनप्रीतचा संघ प्रतिस्पर्ध्यांना अजिबात हलक्यात घेणार नाही. सात विजेतेपदे मिळवून भारत हा या खंडांतर्गत स्पर्धेतील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. तर 2004 मधील पहिल्या आवृत्तीपासून श्रीलंका आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एकदा ही स्पर्धा जिंकली आहे. श्रीलंका सध्याचा विजेता आहे तर बांगलादेशने 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती.
भारत संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार, शेफाली वर्मा, भारती फुलमाली, दीप्ती शर्मा, रिचा घोष, जी. कमलिनी, अरुंधती रे•ाr, प्रेमा रावत, राधा यादव, श्री चरणी, रेणुका ठाकुर, नंदिनी शर्मा, क्रांती गौड, प्रतीका रावल.
बांगलादेश संघ : निगार सुलताना जॉटी (कर्णधार), नाहिदा अख्तर, दिलारा अख्तर, फरजाना इस्मिन, जुएरिया फिरदौस, शर्मीन अख्तर सुप्ता, सर्मीन सुलताना, शोभना मोस्तरी, शोरना अख्तर, रितू मोनी, फहिमा खातून, राबेया खान, मारुफा अख्तर, सुलताना अख्तर.
सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता.
Source link



