पुढील 3 दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई – राज्यात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा वेग मंदावल्याने अनेक भागात पावसाने दडी मारली होती. सुरुवातीच्या दमदार पावसानंतर निर्माण झालेली विश्रांती आता संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला असून काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावरील भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावर दिसून येणार असून १ आणि २ जुलैदरम्यान तळकोकण, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. त्यानंतर ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई, उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि राज्यातील अंतर्गत भागातही चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
यंदाच्या हंगामात आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा लक्षणीय कमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली असली तरी जुलै महिन्यात मान्सून पुन्हा सक्रिय होऊन पावसाची उणीव काही प्रमाणात भरून निघेल, अशी अपेक्षा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसपर्यंत घट होण्याचाही अंदाज आहे.
दरम्यान, आज अमरावती जिल्ह्यासाठी हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर वर्धा, नागपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
याशिवाय सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, सांगली, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, बुलढाणा, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर कोल्हापूर, पालघर, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, तर शेतकऱ्यांनीही पुढील काही दिवसांचा अंदाज लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Source link



