नागालँडमध्ये भूस्खलन, आठ जणांचा मृत्यू

मुसळधार पावसामुळे आपत्ती : 12 जखमींवर इस्पितळात उपचार
वृत्तसंस्था/ कोहिमा
मुसळधार पावसामुळे नागालँडच्या मोन जिह्यात रविवारी सकाळी झालेल्या मोठ्या भूस्खलनात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. डिफेन्स कॉलनी परिसरात घडलेल्या या आपत्तीत 10 ते 15 घरे गाडली गेली. त्यापैकी 13 घरे पूर्णपणे बाधित झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. परंतु सततचा पाऊस, माती कोसळण्याचा धोका आणि जोरदार पाण्याच्या प्रवाहामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत. मुख्यमंत्री नेफियू रिओ यांनी या आपत्तीवर तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना तात्काळ सानुग्रह अनुदान व बाधित कुटुंबांना आर्थिक मदत जाहीर केली.
संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आसाम रायफल्स, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, नागालँड पोलीस, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक स्वयंसेवक संयुक्तपणे बचावकार्य करत आहेत. मुसळधार पावसामुळे मोन शहराच्या इतर भागांमध्येही भूस्खलन आणि पाणी साचले आहे. नदीकाठाची वेगाने धूप झाल्यामुळे इतर अनेक घरेही धोक्यात आहेत. बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवले जात आहे.
मोन परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला होता. यानंतरच भूस्खलन होऊन अनेक घरांना धोका निर्माण झाला. सकाळी 6-7 वाजण्याच्या सुमारास भूस्खलनाची माहिती आपत्ती निवारण केंद्राला दिल्यानंतर एसडीआरएफ, पोलीस, आसाम रायफल्स, एनडीआरएफ आणि स्थानिक लोकांची पथके शोध आणि बचावकार्यासाठी दाखल झाली. दिवसभर अनेक ठिकाणी शोध आणि बचावकार्य सुरू होते.
Source link



