देवस्थान कमिट्यांचे प्रश्न सोडवण्याबाबत सकारात्मक चर्चा

लवकरच होणार अंमलबजावणी ;
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समन्वय समितीचा पुढाकार
ओटवणे : प्रतिनिधी
गावागावातील स्थानिक देवस्थान व्यवस्थापन समितींना कारभार पाहताना येणाऱ्या अडचणी व प्रश्नांसंदर्भात बुधवारी सायंकाळी सावंतवाडी तालुका देवस्थान समन्वय समिती आणि कोल्हापूर येथील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे प्रशासक तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखम सावंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीचे प्रशासक तथा कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी देवस्थान व्यवस्थापन समितींच्या विविध मागण्यांबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे आदेश पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अधिकारी वर्गांना दिले.या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार स्थानिक देवस्थान उपसमिती निवडताना ग्रामसभे ऐवजी मंदिरामध्ये गाव सभा आयोजित करावी. चारित्र्य दाखला पोलीस पाटील अथवा सरपंच यांचा मान्य करावा. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीवर वकील म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवस्थान निष्णात दोन वकिलांची नियुक्ती करावी. जिल्ह्यातील देवस्थान मंदिरांसाठी आलेला पर्यटन निधीसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान कमिटीच्या मान्यता न घेता त्या त्या व्यवस्थापन समितीच्या अधिकाराखाली वितरीत करावा. जिल्ह्यातील सर्व मंदिरे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अखत्यारितून मुक्त करून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र देवस्थान कमिटी नेमण्यात यावी या समस्या व प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी सावंतवाडी देवस्थान समन्वय समितीचे अध्यक्ष एम एल सावंत (कोलगाव), उपाध्यक्ष ज्ञानेश्वर परब (आंबेगाव), सचिव बाळू उर्फ राजाराम सावंत (बांदा), कमिटी सल्लागार विलास सावंत,(डिंगणे) सदस्य पंढरी राऊळ (सांगेली), यशवंत सावंत (डिंगणे), प्रतापराव देसाई ( कळणे ), प्रसाद परब, सचिन सावंत आदी उपस्थित होते.
Source link



