जिकडे तिकडे पडून असलेले बॅरिकेड्स एकत्र करण्याचे काम सुरू

बेळगाव : विविध सण, उत्सव व इतर बंदोबस्ताच्या काळात पोलीस खात्याकडून शहर व उपनगरात बॅरिकेड्स लावले जातात. मात्र, अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे बॅरिकेड्स एकाच ठिकाणी पडून असल्याने त्यांची दूरवस्था झाली आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी अनेक वर्षे बॅरिकेड्स पडून आहेत, ते एकत्र करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. बेळगाव शहर आणि तालुक्यात महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक सण, उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्याचबरोबर आंदोलने, मोर्चे शांततेत पार पडावेत, यासाठी विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावले जातात. संवेदनशील व अतिसंवेदनशील ठिकाणी बारा महिने बॅरिकेड्स पडून असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून अशा बॅरिकेड्सकडे दुर्लक्ष झाले असल्याने देखभालीअभावी ते मोडकळीस आले आहेत. दरवर्षी या ना त्या संस्थांकडून पोलीस खात्याला बॅरिकेड्स देणगी स्वरुपात दिले जातात. त्यामुळे नवे बॅरिकेड्स उपलब्ध होत असल्याने जुन्या बॅरिकेड्सकडे दुर्लक्ष होत आहे. बाजारपेठेसह ग्रामीण भागात रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या बॅरिकेड्सची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे बॅरिकेड्सना कोणी वाली आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला जात होता. त्यामुळे प्रशासनाने जिकडे तिकडे पडून असलेले जुने बॅरिकेड्स एकत्र करण्यास सुरुवात केली आहे.
Source link



