चित्ररथ मिरवणुकीला थाटात प्रारंभ

पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन : सनई-चौघड्यांच्या सुरांमुळे आली रंगत
बेळगाव : बेळगावच्या पारंपरिक शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला सनईचौघड्यांच्या सुरात मंगळवारी सायंकाळी 6.30 वाजता सुरुवात झाली. नरगुंदकर भावे चौक येथून सुरू झालेल्या या पालखी मिरवणुकीमध्ये टाळमृदंगाचा गजर करीत वारकरी सहभागी झाले होते. शिवप्रेमी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या हस्ते पूजन करून पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली.
शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला परंपरेप्रमाणे पालखी मिरवणुकीने सुरुवात होते. प्रारंभी मारुती गल्ली येथे पूजन करून वाजतगाजत पालखी नरगुंदकर भावे चौकात आणण्यात आली. तेथे शिवरायांची आरती म्हणून पालखीला सुरुवात करण्यात आली. वडगाव येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या वारकऱ्यांनी अभंगांच्या माध्यमातून पालखीमध्ये पारंपरिकता आणली. कणबर्गी येथील सरकारी मराठी शाळेच्या मुला-मुलींनी शिवकालीन युद्धकला सादर करून उपस्थित शिवभक्तांचे मन जिंकले. मंगळवारी सकाळपासून विविध मंडळांनी आपले चित्ररथ मारुती गल्ली परिसरात आणून लावले होते. परंतु पात्रे तयार करण्यास विलंब होत असल्याने रात्री 8.30 पर्यंत कुठल्याही मंडळाच्या देखावा सादरीकरणाला सुरुवात झाली नव्हती.
उद्घाटन कार्यक्रमाला खासदार जगदीश शेट्टर, महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाली, आमदार आसिफ सेठ, माजी आमदार अनिल बेनके, मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे, रेणू किल्लेकर, मालोजी अष्टेकर, रमाकांत कोंडुसकर, माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, भाजप नेते किरण जाधव, नगरसेवक रवी साळुंखे, रणजित चव्हाण-पाटील, प्रकाश शिरोळकर, गणेश दड्डीकर, मदन बामणे, शिवराज पाटील, बंडू केरवाडकर, रमेश पावले, बाबू कोले, शिवाजी सुंठकर, सुधा भातकांडे, माया कडोलकर, अॅड. अमर यळ्ळूरकर, श्रीकांत कदम, मुरगेंद्रगौडा पाटील, डॉ. रवी पाटील, सुभाष पाटील, महेश जुवेकर, राजू मरवे, विनोद आंबेवाडीकर यांच्यासह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाट गल्ली मंडळाकडून सर्वात प्रथम देखावा सादर
चव्हाट गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळाने यावर्षी संयुक्त महाराष्ट्र चौक येथे मंडप उभारणी करून देखाव्याचे सादरीकरण केले. रात्री 8.30 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटनाचा सोहळा पार पडला. रात्री 9 नंतर सादरीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे बाहेरगावच्या नागरिकांना देखावा पाहण्यासाठी उत्तम सोय झाली. त्यामुळे शिवभक्तांमधून या मंडळाचे कौतुक करण्यात आले. त्या पाठोपाठ ताशिलदार गल्ली येथील शिवजयंती उत्सव मंडळानेही देखाव्याचे सादरीकरण केले.
ढोलताशासह रणरागिणींचा जल्लोष
पालखी मिरवणुकीला सुरुवात होताच नरवीर ढोलताशा पथक तसेच रणरागिणी ध्वजपथकाने वादनाला सुरुवात केली. शंभरहून अधिक ध्वजपथक घेतलेल्या युवती एकाच तालात ध्वज नाचवत असल्याने हे पाहून याचे चित्र मोबाईलमध्ये कैद करण्याचा मोह शिवभक्तांना आवरला नाही. त्याचबरोबर नरवीर ढोलताशा पथकाने सुंदररीत्या ढोलताशाचे वादन केले.
Source link



