Uncategorized

ग्रोबिग कंपनीच्या रूम मुदतवाढीवर उद्या नगरपरिषदेत ठराव

सावंतवाडीत सत्ताधारी -विरोधकांची राजकीयप्रतिष्ठा पणाला

सावंतवाडी । प्रतिनिधी

जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांच्या ग्रोबिग टेक्नॉलॉजी कंपनीला जिमखाना मैदान येथील बाळासाहेब ठाकरे अकादमीमधील भाडेतत्त्वावरील रूमची मुदतवाढ द्यायची की नाही, यावर सावंतवाडी नगरपरिषदेच्या बुधवारी होणाऱ्या मासिक सभेत निर्णय होणार असून, या ठरावाकडे संपूर्ण सावंतवाडीकरांचे लक्ष लागले आहे.मायकल डिसोजा यांच्या ग्रोबिग टेक्नॉलॉजी कंपनीमार्फत आउटसोर्सिंगच्या माध्यमातून युवकांना रोजगार आणि प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. या प्रशिक्षण उपक्रमासाठी कंपनीने जिमखाना मैदानावरील बाळासाहेब ठाकरे अकादमीमधील एक रूम भाड्याने घेतली होती. त्यावेळी उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांनी या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला होता.

मात्र, या रूमच्या भाडे आणि मुदतवाढ प्रक्रियेसंदर्भात नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी अडवणुकीचे धोरण अवलंबल्याचा आरोप मायकल डिसोजा यांनी केला होता. तसेच अवाच्या सवा भाडे आकारून मनमानी पद्धतीने कारभार सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली होती. या आरोपांमुळे सावंतवाडीच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती.याच पार्श्वभूमीवर आता ग्रोबिग टेक्नॉलॉजी कंपनीला देण्यात आलेल्या रूमची मुदतवाढ मंजूर करण्याचा ठराव बुधवारी नगरपरिषदेच्या सभेपुढे येणार आहे. त्यामुळे हा विषय केवळ प्रशासकीय न राहता राजकीय प्रतिष्ठेचा बनला आहे.एका बाजूला युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असून दुसऱ्या बाजूला नगराध्यक्षांवर करण्यात आलेल्या आरोपांमुळे सत्ताधाऱ्यांच्या प्रतिष्ठेचा मुद्दा निर्माण झाला आहे. त्यामुळे सत्ताधारी गट हा ठराव मंजूर करणार की नाकारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.तसेच विरोधी शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट या विषयावर कोणती भूमिका घेतात, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे. ग्रोबिग कंपनीच्या मुदतवाढीचा हा ठराव मंजूर होतो की नाही, यावरून नगरपरिषदेत रोजगाराला प्राधान्य दिले जाते की राजकीय प्रतिष्ठेला, याचे उत्तर उद्याच्या सभेत मिळणार आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचीही खरी कसोटी बुधवारी लागणार असल्याचे बोलले जात आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​