गौतम अदानी पुन्हा आशियातले सर्वाधिक श्रीमंत

अमेरिकेतील आरोप फेटाळल्याने समूहातील समभाग दौडले
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
अदानी समूहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे आशियातले सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून पुन्हा एकदा गणले गेले आहेत. फोर्ब्जच्या रिअलटाइम बिलियनेयरच्या यादीत त्यांनी हे स्थान पटकावले आहे. त्यांनी दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि सॉफ्ट बँकेचे सीईओ मासायोशी सोन यांना मागे टाकले आहे.
फोर्ब्जच्या अहवालानुसार प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांची एकूण संपत्ती वाढीसोबत 89.2 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. या पाठोपाठ रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 88 अब्ज डॉलर्सची दिसून आली आहे. याच्यापाठोपाठ मासायोशी सोन यांची एकूण संपत्ती 87 अब्ज डॉलर्सवर राहिली आहे. जपानमधील गुंतवणूक कंपनी असलेल्या सॉफ्ट बँकेचा समभाग मोठ्या प्रमाणात घसरलेला दिसून आला. यामुळेच मासायोशी यांच्या संपत्तीमध्ये घट झाली. त्यामुळे त्यांनी आशियातील सर्वाधिक श्रीमंत हे स्थान गमावले आहे.
समभागांची दमदार इनिंग
दुसरीकडे अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग मोठ्या प्रमाणात तेजीत राहिल्याने गौतम अदानी यांच्या संपत्तीत आपसूकच वाढ झालेली दिसून आली. त्यामुळे आशियातील सर्वाधिक श्रीमंत म्हणून गौतम अदानी यांनी पुन्हा एकदा स्थान प्राप्त केले. शुक्रवारी अदानी समूहाचे सर्वच समभाग मोठ्या प्रमाणात तेजीत असलेले पाहायला मिळाले. यामध्ये अदानी ग्रीन एनर्जी यांचा समभाग सर्वाधिक 7 टक्क्यांपर्यंत वर चढला होता. या पाठोपाठ पाहता अदानी एनर्जी सोल्युशन्सचा समभाग 4 टक्के तर अदानी एंटरप्राइजेस व अदानी पोर्टस यांचे समभाग एकत्रितपणे दोन टक्के इतके मजबूत पाहायला मिळाले. यांच्यासोबत अदानी पॉवर या ऊर्जा क्षेत्रातील कंपनीनेसुद्धा 1 टक्का इतकी वाढ नोंदवली होती. वर्ष 2026 मध्ये पाहता आतापर्यंत अदानी समूहातील विविध कंपन्यांचे समभाग हे जवळपास 23 ते 56 टक्क्यांपर्यंत उसळले आहेत.
अमेरिकेतील आरोप फेटाळल्याचा फायदा
महत्त्वाचे म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये अमेरिकेतील न्यायालयाने अदानी समूहावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या सकारात्मक बातमीचा परिणाम समूहातील कंपनीच्या समभागांवर सकारात्मक पाहायला मिळाला. आरोप फेटाळल्यानंतर पाहता गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये जवळपास 10 अब्ज डॉलर्सची वाढ झालेली दिसून आली. आरोप फेटाळल्याच्या निर्णयानंतर गुंतवणूकदार पुन्हा एकदा समूहातील समभाग खरेदी करण्यासाठी पुढे आले. 2023 मध्ये अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग यांच्या आरोपामुळे समूहातील समभाग मोठ्या प्रमाणात घसरले होते.
जागतिक स्तरावर अदानी 23 वे
फोर्ब्जच्या रियल टाईम बिलेनियर यादीनुसार सध्याला जागतिक स्तरावर गौतम अदानी हे 23 वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्यानंतर रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी यांचा आणि मासायोशी सोन यांचा क्रमांक लागतो. शुक्रवारी सर्वाधिक संपत्तीत वाढ होणाऱ्यांच्या यादीमध्येही गौतम अदानी यांचे नाव प्रामुख्याने सामील होते. त्यांची एकाच दिवसामध्ये संपत्ती जवळपास 2.5 अब्ज डॉलर्सने वाढली होती.
Source link



