कुटुंबियांसमवेत मुख्यमंत्री भेटले पंतप्रधान मोदींना

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सहकुटुंब भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मुख्यमंत्री सावंत यांनी दिल्लीतील ‘सेवा तीर्थ’ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आपले वडील पांडुरंग सावंत, पत्नी सुलक्षणा व मुलगी पार्थवी यांच्या समवेत ही भेट घेतली. त्यानंतर ही भेट म्हणजे अविस्मरणीय असून, वडिलांसमवेत पंतप्रधान मोदी यांच्याशी झालेल्या भेटीमुळे आपल्याला विशेष आनंद झाल्याचे भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना सांगितले. जनसंघाच्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवात करणारे आपल्या वडिलांनी आयुष्यभर सेवाभाव जपला. त्याच विचारातून आपण सार्वजनिक जीवनात कार्यरत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.
देशसेवा आणि संघटन कार्यासाठी कोट्यावधी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिल्याबद्दल मुख्यमंत्री सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी गोव्याशी संबंधित विविध विषयांवर चर्चा केली. गोव्यातील विकासकामे याबाबत डॉ. सावंत यांनी शाह यांना माहिती दिली. गोव्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन शाह यांनी डॉ. सावंत यांना दिले. त्यांची चर्चा फलदायी ठरल्याचे सांगण्यात आले. डॉ. सावंत यांनी शाह यांना देवीची मूर्ती भेट दिली. गोव्यातील आगामी विधानसभा निवडणूक, एसटीसाठी विधानसभा मतदारसंघ राखवीता, संभाव्य उमेदवार असे विविध विषय चर्चेसाठी घेण्यात आले होते. त्यांच्या भेटीची अधिक माहिती डॉ. सावंत गोव्यात आल्यावर मिळणार आहे.
Source link



