सांगेली गावातील अवैध धंदे तात्काळ बंद करा; ग्रामस्थांची मागणी

ओटवणे / प्रतिनिधी : सांगेली गावातील दारूविक्री, मटका आणि जुगार यांसारखे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, अशी मागणी सांगेली ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी सोमवारी पालकमंत्री, आमदार, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदन देऊन लक्ष वेधले.
सांगेली गावात अवैध धंदे कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव सुमारे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीत एकमताने करण्यात आला होता. मात्र, या ठरावानंतरही गावात दारूविक्री, मटका आणि जुगार सुरूच असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावात बेकायदेशीरपणे दारूविक्री, मटका आणि जुगार सुरू असल्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, युवक व्यसनांच्या आहारी जाण्याची शक्यता वाढत आहे. तसेच महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून, भांडणे, वादविवाद आणि कायदा-सुव्यवस्थेच्या समस्या निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या समस्येबाबत गाव बैठकीत निर्णय झाल्यानंतर अनेक वेळा पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र, अपेक्षित कारवाई झाली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित अवैध धंद्यांची तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनाच्या प्रती पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडेही देण्यात आल्या आहेत.
यावेळी सांगेलीचे माजी सरपंच रमाकांत राऊळ, राकेश देवकर, पुरुषोत्तम राऊळ, माजी उपसरपंच वामन नार्वेकर, आनंद राऊळ, महेश राऊळ, बापू आईर, सुनील पवार, बाळा घाडी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
Source link



