मालवणातील 51,61 लाखांच्या फसवणूक प्रकरणात शुभम देशमुखला न्यायालयाचा दणका; जामीन नामंजूर

मालवण / प्रतिनिधी : मालवण शहरातील नागरिकांना कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवून ‘प्रोसेसिंग फी’ व इतर प्रशासकीय खर्चाच्या नावाखाली 51 लाख 61 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी शुभम कृष्णकांत देशमुख (रा. कळंबा, कोल्हापूर) याचा जामीन अर्ज मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. फकीह यांनी नामंजूर केला.
या प्रकरणात फिर्यादींच्या वतीने अॅड. कौस्तुभ मराठे, अॅड. प्राजक्ता शिंदे आणि अॅड. ऐश्वर्य मांजरेकर यांनी युक्तिवाद केला.
मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२३ ते जानेवारी २०२५ या कालावधीत मालवण शहरातील कर्जाची गरज असलेल्या भारती घारकर, सागर आढाव यांच्यासह अनेक नागरिकांना सिबिल तपासणी न करता कर्ज उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. कर्जाच्या ‘प्रोसेसिंग फी’सह विविध प्रशासकीय खर्चाच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये घेण्यात आले.
एकूण 51,61000 जमा केल्यानंतरही प्रत्यक्षात कर्ज देण्यात आले नाही. याप्रकरणी धुरीवाडा, मालवण येथील रहिवासी भारती घारकर यांनी मालवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तक्रारीवरून शुभम कृष्णकांत देशमुख याच्यासह महमुना शेख, प्रियांका खबडे, राहुल खाबडे, उमेश कांबळे, सुरेखा पाटील, आनंद माने, सचिन साबळे, सुरेश पाटील, महेश शिंदे आणि रेणुका वड यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 316 (2), 316 (5), 318 (4) आणि3 (5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी शुभम देशमुख याचा सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर मालवण प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्यात आलेला जामीन अर्जही फेटाळण्यात आला आहे.
या निर्णयामुळे 51.61 लाख रुपयांच्या कथित आर्थिक फसवणूक प्रकरणात आरोपीच्या अडचणी वाढल्या असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link



