Uncategorized

कुंडलिनी जागृत झालेल्या योग्यामध्ये अलौकिक शक्ती आलेल्या असतात

शांत निर्भय मच्चित्त ब्रम्हचर्य-व्रती स्थिर । मन रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण ।। 14 ।।

हा श्लोक आपण पहात आहोत. विवरणात माउली म्हणतात, आसनसिद्धी झाल्यावर मूलबंधात कोंडला गेलेला अपानवायू ऊर्ध्वगतीने माघारा फिरून मणिपूर चक्राला धक्के देत रोगांना नष्ट करतो. वज्रासनाच्या उष्णतेने कुंडलिनी जागृत होते. ती अनेक प्रताप दाखवल्यावर प्राण आणि अपान रोखून शांत होते. तिने तोंडाने ओकलेल्या अमृताने शरीरात आत व बाहेर थंडावा निर्माण होतो, त्यामुळे सर्व शरीरात नवचैतन्याचा उदय होतो. योग्याचे शरीर तेजस्वी दिसू लागते. त्याचे म्हातारपण मागे फिरते, तारुण्याचा वियोग होतो आणि गेलेली बाल्यावस्था परत येते. शरीर दिसायला जरी काटकुळे दिसत असले तरी बलवान पुरुष जी कृत्ये करू शकतो, तेवढी हा करतो आणि त्याच्या धैर्याच्या थोरवीला तर उपमा नाही. सोन्याच्या झाडाला पालवी फुटून जशी रत्नाची नित्य कळी यावी तशी झडलेल्या नखांच्या जागी नवी नखे येतात. दातही नवे येतात. ते नाजूक असल्याने जणुकाय दुतर्फा हिऱ्यांची रांगच बसली आहे असे वाटते. ज्याप्रमाणे माणकाचे अणुएवढाले कण असावेत त्याप्रमाणे सहजच सर्व अंगावर केसांची अग्रे वर येतात. तळहात व तळपाय हे तांबड्या कमळाप्रमाणे असतात व डोळे किती स्वच्छ होतात हे काय सांगू? परिपूर्ण दशेला येऊन गच्च भरल्यामुळे मोती शिंपेत मावत नाहीत, म्हणून जसा शिंपेच्या दोन शकलांचा सांधा उकलतो त्याप्रमाणे दृष्टी पापण्यांच्या कवळीत न मावता त्या कवळीला व्यापून बाहेर निघू पाहते. दृष्टी पूर्वीचीच असते परंतु ती आकाश व्यापी होते. देह सोन्याच्या कांतीचा होतो, परंतु त्यात पृथ्वीचे व पाण्याचे अंश नसल्याने तो वायूसारखा हलका होतो. ह्या सर्व बदलाचा परिणाम होऊन त्याच्यात अलौकिक शक्ती आलेल्या असतात. त्यामुळे तो समुद्राच्या पलीकडचे पाहतो, स्वर्गातील विचार ऐकतो, मुंगीच्या मनातील भाव ओळखतो. वायुरूप घोड्यावर बसतो व पाण्यावर चालतो, अशा अनेक प्रकारच्या सिद्धी त्यास प्रसंगानुरूप प्राप्त होतात. कुंडलिनी शक्ती प्राणवायूचा हात धरून, आकाशाची पायरी करून, सुषुम्नारूप जिन्याने हृदयात येते. जी कुंडलिनी जगाची आई आहे, ब्रह्मरूपी सार्वभौमाची शोभा आहे व जिने विश्वाच्या बीजाच्या कोंभाला आश्रय दिला आहे, जी निराकार परमात्म्याचे चिन्ह दाखवणारी पिंडी, जी परब्रह्मरूपी शिवाची संबळी व जी प्राणांची उघड उघड जन्मभूमी आहे. ती हृदयात म्हणजे अनाहत चक्रात येऊन अनाहताच्या शब्दाने बोलते. कुंडलिनीला चिकटून राहिलेल्या जाणण्याच्या शक्तीने तो अनाहत शब्द किंचित ऐकलेला असतो. मग त्या अनाहतरूप मेघाने आकाश दुमदुमायला लागते, तेव्हा ब्रह्मस्थानाचे द्वार आपोआप उघडते. कमळाच्या गर्भाच्या आकाराप्रमाणे असलेल्या र्मूध्न्याकाशाचे ठिकाणी चैतन्य अर्धे भोजन करून अतृप्त असते. त्या चैतन्याला हृदयाकाशाच्या माजघरात असणारी कुंडलिनीदेवी तिच्या तेजाची शिदोरी अर्पण करते. याप्रमाणे आपले तेज अर्पण केल्यावर ती कुंडलिनी केवळ प्राणवायुरूप होते, तेव्हा ती कशी भासते म्हणून म्हणाल तर हृदयकमळापर्यंत सोन्याची सरी अथवा प्रकाशरूप जलाचा झरा वहात आला तर कसा दिसेल तशी ती दिसते.

क्रमश:


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​