किणी -हुंदळेवाडी परिसरात शेततळ्यात बुडून तीन चिमुरड्या मुलींचा दुर्दैवी अंत…गावावर शोककळा

चंदगड तालुक्यातील किणी-हुंदळेवाडी परिसरात रविवारी सायंकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला आहे. शेततळ्यात बुडून तीन चिमुरड्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून या घटनेमुळे गावात एकच आक्रोश पसरला आहे.
मृत मुलींमध्ये धनुष्का पुंडलिक सांबरेकर (वय १५) (हुंदळेवाडी) , स्वराली जयवंत नाईक (वय १३) (होसुर )आणि रिया चंद्रकांत सांबरेकर (वय १०) (हुंदळेवाडी) ,
यांचा समावेश आहे. या तिन्ही मुली हुंदळेवाडी येथील असून आपल्या आजोळी आल्या होत्या. धनुष्का आणि रिया या गोव्याहून तर स्वराली ही कोल्हापूरहून आई-वडिलांसोबत आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी चारच्या सुमारास काही मुले किणी-हुंदळेवाडी गावाजवळील शेततळ्याच्या परिसरात फिरत होती. त्याचवेळी शेताकडे जाणाऱ्या एका व्यक्तीला तलावाजवळ एक लहान मुलगा दिसला. विचारपूस केली असता “आमच्या ताई पोहत आहेत,” असे त्या मुलाने सांगितले. मात्र संशय आल्याने त्या व्यक्तीने तातडीने पाण्यात उतरून शोध घेतला असता तिन्ही मुली पाण्यात बुडालेल्या अवस्थेत आढळून आल्या.
घटनेची माहिती गावात समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मुलींना बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
या घटनेनंतर संपूर्ण हुंदळेवाडी गाव शोकमग्न झाले असून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू तर मनात हळहळ दिसून येत होती. काही दिवसांपूर्वीच या मुलींच्या आजी विमल नारायण सांबरेकर यांचे निधन झाले होते. त्या दुःखातून कुटुंब सावरत असतानाच या तीन निष्पाप चिमुकल्यांच्या मृत्यूने सांबरेकर आणि नाईक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. गावाबाहेरील शाळेजवळ झोपाळ्यावर खेळण्यासाठी नेहमी जाणाऱ्या या मुली रविवारीही खेळण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. मात्र नियतीने त्यांच्या आयुष्याचा खेळच संपवला.
घटनेनंतर तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी चंदगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. या घटनेमुळे कोवाड परिसरात पोस्टमार्टम सुविधेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कोवाड येथे शवविच्छेदनाची सुविधा नसल्याने अशा प्रत्येक घटनेत मृतदेह तब्बल ३० किलोमीटर दूर चंदगड येथे न्यावे लागतात. त्यामुळे दुःखात असलेल्या नातेवाईकांना मानसिक, आर्थिक आणि वेळेचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
कोवाडसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने पोस्टमार्टम सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून जोर धरू लागली आहे.या घटनेची नोंद कोवाड पोलिसांत करण्यात आली असून पीएसआय भिंगारदिवे अधिक तपास करत आहेत.
Source link



