Uncategorized

एका झुरळाने दिल्ली तख्त हादरवले

भारतीय जनमानसात ‘अबला’ म्हणून हिणवलेला महिला वर्ग झुरळाला अतिशय घाबरतो असे एक चित्र निर्माण झाले आहे. स्वयंपाकघरात झुरळ दिसले की एकदम आरडाओरड सुरु होते. नवरोबा झाडू घेऊन धावतो आणि त्याचे पानिपत करतो असे चित्र घराघरात दिसते, पण गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत तर नवलच घडले. 56-इंच छाती असलेले केंद्र सरकार एका झुरळांमुळे इतके हादरले की इतरांना हे काय झाले ते लागलीच कळलेच नाही.

मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या एका वादग्रस्त विधानामुळे वातावरण इतके तापले आहे की बेकार तरुणांना त्यांनी ‘कॉकरोच’ (झुरळ) आणि ‘पॅरासाइट’ (बांडगुळ) असे संबोधून सरकारकरता देशभर एक उद्रेकच ओढवून घेतला आहे. अत्युच्च पदावर बसलेल्या एका न्यायाधीशाने गरीब आणि बेकार तरुणांबाबत कनवाळूपणा दाखवावा अशी अपेक्षा असताना त्यांनी जे विधान केले आहे त्याने मोदी सरकार अडचणीत आलेले आहे.

आजच्या जनरेशन झेडच्या जमान्यात समाज माध्यमांवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ ची स्थापना करण्यात आली आणि तिच्याशी लाखो तरुण जोडले गेले. दहा दिवसात या मोहिमेबरोबर 2.3 कोटी तरुण जोडले गेले आहेत असा दावा या चळवळीचे जनक अभिजीत दिपके यांनी केलेला आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी या चळवळीमागे परकीय शक्तींचा हात आहे आणि तिच्याशी जोडले गेलेले बहुतांश विदेशी आहेत असा केलेला दावा खोडून काढला आहे. आमच्या मोहिमेशी जुडलेले 94 टक्के लोक भारतीय आहेत आणि ते शांतीपूर्ण मार्गाने आंदोलन करण्याकरता प्रतिबद्ध आहेत असे त्यांचे म्हणणे आहे, दिपके हा आपल्या मराठवाड्यातील तरुण. ज्याप्रकारे मनोज जरांगे पाटील या मराठवाड्यातील तरुणाने मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारला सळो की पळो करून सोडले होते, त्याचप्रमाणे दिपके यांनी पुढे केलेले झुरळ मोदी सरकारला जळी स्थळी पाषाणी दिसत आहे.

गमतीची गोष्ट अशी की गेल्या 12-13 वर्षात समाज माध्यमांचा इतका प्रभावी वापर करून विरोधकांना भाजपने निष्प्रभ केलेले आहे. अशावेळी एक झुरळ कोणत्यातरी सांदी कोपऱ्यातून पुढे येते आणि राजकीय सुपरस्टार बनते. या प्रकाराने सत्ताधारी हैराण झालेले आहेत. भाजपचा कारभारच हडेलहप्पी आहे. त्यामुळे जिथे सोनाराचा छोटा हातोडा वापरायचा तिथे ते लोहाराचा घण वापरून अजूनच स्थिती नाजूक बनवतात हे वारंवार दिसून आले आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे समाज माध्यमांवरील फालोअर हे एका आठवड्यात एव्हढे वाढले की त्यांनी भाजपची पंचाईत करून ठेवली. 12-13 वर्षात भाजपला जे जमले नव्हते ते या चळवळीने एका आठवड्यात साध्य केले, गेली बारा वर्षे सत्तेत असलेल्या भाजपचा सध्यातरी एकछत्री अंमल सुरु आहे अशा वेळी ‘कोण मला वठणीवर आणू शकतो ते मी पाहे?’ असा त्याला गर्व होणे साहजिकच आहे. अशावेळी हा अचानक उपटसुंभ कोण बरे उपटला असा प्रश्न त्यापुढे पडला तर वावगे नाही. ‘कॉकरोच जनता पार्टी’ला एक अजेन्डा आहे त्यातून तरुणाईची हाक ऐकू येत असल्याने तो वर्ग मोठ्या प्रमाणावर त्या पक्षाकडे/चळवळीकडे आकर्षित झालेला आहे. हा पक्ष सर्वधर्मसमभावी, सोशालिस्ट, लोकशाहीवादी तसेच आळशी आहे. तरुण वर्गाला त्यात आपापले प्रतिबिंब दिसत आहे. त्यामुळे सध्यातरी त्याची क्रेझ वाढत आहे. भाजप, काँग्रेससह कोणताही पक्ष तरुणाईशी असा संवाद साधू शकलेला नाही. त्यामुळे ‘झुरळाचे’ महत्त्व ज्यादा आहे.

स्वत:, एक अनरजिस्टरड पक्ष असूनही कॉकरोच जनता पार्टीने भारतीय राजकारण ढवळून काढलेले आहे कारण त्याच्या नव्या नव्या प्रचारपद्धती या लोकांना भावू लागल्या आहेत. देशात मोठ्या प्रमाणावर पसरलेली गोदी मीडिया गैर भाजप पक्षांना अनुल्लेखाने मारते. सरकारने या पक्षाच्या एक्स हॅन्डलवर बंदी आणली तर त्याचा परिणाम उलटाच झाला.

इंस्टाग्रामवरील फॉलोवर वाढले

या अनपेक्षित संकटाने भाजप एव्हढी हैराण झालेली आहे की लडाखचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी सोनम वांगचुक यांच्यासारख्या नेत्याला कॉकरोच जनता पार्टीपासून दूर राहण्याची ताकीद दिली. विदेशी शक्ती या पक्षामागे आहेत असा त्यांनी आरोप केला. तात्पर्य काय तर या पक्षाला कशा प्रकारे हाताळावयाचे हे सरकारला कळेनासे झालेले आहे. कोर्टामध्ये देखील या पक्षाच्या एक्स हॅन्डलवर बंदी उठवण्याचा प्रयत्न सरकार हाणून पाडत आहे. मराठवाड्यात राहात असलेल्या दिपके यांच्या आई-वडिलांना धमक्या मिळत आहेत आणि त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आलेले आहे, भारतात पाय ठेवल्याठेवल्या आपल्याला सरकार पकडेल अशी भीती बोस्टन युनिव्हर्सिटीचे पदवीधर असलेले दिपके व्यक्त करत आहेत. अशावेळीच अर्थव्यवस्थेची अवस्था ही दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. मोदी सरकारचे एकेकाळचे समर्थक असे अर्थतज्ञ हे सरकार ती सुधारण्यासाठी  कोणतीही कृती करत नाहीत म्हणून आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त करत आहेत.

सुरजित भल्ला हे एकमेव अर्थतज्ञ त्यात नसून संजय बारू. अरविंद सुब्रमणियम यासारखे मोदी सरकारची अगोदर री ओढणारे तज्ञ आहेत. त्यांच्यापैकी काहींनी तर अर्थ मंत्रालयात आमूलाग्र बदलाचा आग्रह धरून निर्मला सीतारामन आणि त्यांच्या सल्लागारांना घरी पाठवण्याचे काम सरकारने केले पाहिजे असे सांगितले, माजी वित्त सचिव सुभाषचंद्र गर्ग यांचा सरकारवर हल्ला अजून तीव्र होत आहे तर रिझर्व्ह बँकेचे माजी प्रमुख या घसरणीने चिंताग्रस्त झालेले आहेत.

सुनील गाताडे


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​