आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल ‘चॅम्पियन’

अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा 5 गड्यानी पराभव, कोहलीची नाबाद अर्धशतकी खेळी
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
किंग कोहलीच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरने (आरसीबी) गुजरात टायटन्सचा 5 गड्यांनी पराभव करून सलग दुसऱ्यांदा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले. कोहलीने 42 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह नाबाद 75 धावांची खेळी केली. गुजरातच्या वॉशिंग्टन सुंदरचे नाबाद अर्धशतक वाया गेले.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरच्या शिस्तबद्ध आणि भेदक गोलंदाजीसमोर रविवारी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला 20 षटकात 8 बाद 155 धावापर्यंत मजल मारता आली. वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद अर्धशतकामुळे गुजरातला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रत्युत्तरादाखल खेळताना आरसीबीने 18 षटकात 5 बाद 161 धावा जमवित दणकेबाज विजयासह आयपीएल चषकावर आपले नाव सलग दुसऱ्यांदा कोरले.
वेंकटेश अय्यर आणि विराट कोहली यानी डावाला दमदार सुरूवात करताना 27 चेंडूत 62 धावांची भागीदारी केली. अय्यरने 16 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 32 धावा जमविल्या. मोहम्मद सिराजने त्याला झेलबाद केले. त्यानंतर आरसीबीने आपला दुसरा फलंदाज पाठोपाठ गमविला. रबाडाच्या गोलंदाजीवर पडीक्कल केवळ एका धावेवर झेलबाद झाला. एका बाजूने कोहली आत्मविश्वासाने फलंदाजी करत होता. रजत पाटीदारने 13 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 15 धावा जमविल्या. रशिद खानच्या एका षटकात रजत पाटीदार आणि कृणाल पांड्या बाद झाल्याने आरसीबीवर थोडे दडपण आले. बेंगळूरची स्थिती यावेळी 4 बाद 91 अशी होती.
कोहली आणि डेव्हीड यानी 5 गड्यासाठी 41 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. अर्शद खानने डेव्हीडला झेलबाद केले. त्याने 17 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 24 धावा जमविल्या. कोहलीने जितेश शर्माला साथीला घेत संघाला विजय 2 षटके बाकी ठेवून मिळवून दिला. शर्माने 14 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 11 धावा केल्या. कोहलीने अखेर विजयी षटकार खेचला. गुजरातर्फे रशिद खानने 2, तर मोहम्मद सिराज, रबाडा आणि अर्शद खान यानी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
बेंगळूरने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 70 धावा जमविताना 2 गडी गमविले. आरसीबीचे अर्धशतक 21 चेंडूत तर शतक 59 चेंडूत आणि दीड शतक 104 चेंडूत फलकावर लागले. कोहलीने 25 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीच्या डावात 7 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले.
तत्पूर्वी, 2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील रविवारचा हा अंतिम सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा बाळगली जात होती. पण अहमदाबादच्या खेळपट्टीवर विद्यमान विजेत्या आरसीबीच्या गोलंदाजांनी पहिल्या षटकापासूनच गुजरातला फटकेबाजीपासून रोखण्यात यश मिळविले.
आरसीबीने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार गिल आणि साई सुदर्शन यानी 14 चेंडूत 22 धावांची भागीदारी केली. हॅजलवुडच्या भेदक गोलंदाजीसमोर गुजरातची ही सलामीची जोडी बचावात्मक फलंदाजी करत होती. हॅजलवुडने कर्णधार गिलला तिसऱ्या षटकात पाटीदारकरवी झेलबाद केले. त्याने 8 चेंडूत 2 चौकारांसह 10 धावा केल्या. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर साई सुदर्शन शर्माकरवी झेलबाद झाला. त्याने 12 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा केल्या. निशांत सिंधू आणि बटलर यानी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण 8 व्या शतकातील शेवटच्या चेंडूवर रसिख सलामने सिंधुला झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 3 चौकारांसह 20 धावा जमविल्या. कृणाल पांड्याने गुजरातला धक्का देताना बटलरला शर्माकरवी यष्टीचित केले. त्याने 23 चेंडूत 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. हॅजलवुडने आपल्या गोलंदाजीच्या दुसऱ्या हप्त्यात अर्शद खानला झेलबाद केले. त्याने 6 चेंडूत 2 षटकारासह 15 धावा जमविल्या. गुजरातची यावेळी स्थिती 14.1 षटकात 5 बाद 99 अशी होती.
वॉशिंग्टनचे अर्धशतक
वॉशिंग्टन सुंदरने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून नाबाद अर्धशतक नोंदविल्याने गुजरातला 150 धावांची मजल मारता आली. राहुल तेवातीयाने एक चौकारासह 7, होल्डरने 1 चौकारासह 7, रशिद खानने 1 षटकारासह 7 धावा केल्या. वॉशिंग्टन सुंदरने 37 चेंडूत 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. गुजरातने 10 षटकात 8 बाद 155 धावा जमविल्या.
गुजरातच्या डावामध्ये 3 षटकार आणि 15 चौकार नेंदविले गेले. गुजरातने पॉवरप्ले दरम्यानच्या पहिल्या 6 षटकात 45 धावात 2 गडी गमविले. गुजरातचे अर्धशतक 41 चेंडूत, शतक 86 चेंडूत आणि दीडशतक 115 चेंडूत नोंदविले गेले. आरसीबीतर्फे रसिख सलामने 27 धावात 3, हॅजलवुडने 37 धावात 2, भुवनेश्वर कुमारने 29 धावात 2 तर कृणाल पांड्याने 23 धावात 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक : गुजरात टायटन्स 20 षटकात 8 बाद 155 (वॉशिंग्टन सुंदर 37 चेंडूत 5 चौकारांसह नाबाद 50, सुदर्शन 2 चौकारांसह 12, गिल 2 चौकारांसह 10, निशांत सिंधू 3 चौकारांसह 20, अर्शद खान 2 षटकारांसह 15, अवांतर 5. रसिख सलाम 3-27, भुवनेश्वर कुमार 2-29, हॅजलवुड 2-37, कृणाल पांड्या 1-23), रॉयल चॅलेजर्स बेंगळूर- 18 षटकात 5 बाद 161 (विराट कोहली 42 चेंडूत 3 षटकार, 9 चौकारासह नाबाद 75, वेंकटेश अय्यर 16 चेंडूत 2 षटकार, 4 चौकारासह 32, रजत पाटीदार 13 चेंडूत 1 षटकार, 1 चौकारासह 15, टीम डेव्हीड 17 चेंडूत 1 षटकार, 3 चौकारांसह 24, जितेश शर्मा 14 चेंडूत 1 चौकारासह नाबाद 11, अवांतर 2, रशिद खान 2-25, मोहम्मद सिराज, रबाडा, अर्शद खान प्रत्येकी 1 बळी).
Source link



