Solapur Politics महाविकास आघाडीचे मतदार फुटीच्या उंबरठ्यावर

विजयकुमार देशपांडे, सोलापूर साधारण १० वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्था प्राधिकरणातून विधान परिषद निवडणूक जाहीर झाली आणि पुन्हा एकदा महायुती आणि मविआ आमने सामने आली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न झाले. परंतु सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला. पण महाविकास आघाडीतील तीन पक्षातील नेत्यांची तोंडे तीन दिशेला फिरली. त्यामुळे आधीच उल्हास त्यात, ‘फाल्गुन मास’ अशीच काहीशी परिस्थिती महाविकास आघाडीतील नेत्यांची झाली आहे.
गेल्या चार ते पाच महिन्यांपूर्वीच महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या. यामध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली. निवडणूक एकतर्फी होणार असल्याने भाजपने बिनविरोधचे प्रयत्न केले. महाविकास आघाडीतून सोलापूरची जागा काँग्रेसला सोडण्यात आली.
ही जागा काँग्रेसला कोणत्या कारणामुळे सोडण्यात आली हे गुलदस्त्यातच राहिले. पंढरपुरातील आदित्य फत्तेपूरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्याचवेळी राशपनेही पक्षाचा एबी फॉर्म देऊन वसंतराव देशमुख यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला आणि इथेच काँग्रेसचा गेम होणार अशी चर्चा सुरू झाली.
ऐनवेळी सूचकाने दिला नकार
ठरल्याप्रमाणे आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर सही केलेल्या सूचकाने छाननी दिवशी सूचकाची सही आपली नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले. महाविकास आघाडीत पहिला स्फोट झाला. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी अनुपस्थित राहिलेल्या खा. प्रणिती शिंदे यांनी अर्ज बाद झाल्यावर जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यामुळे अनेकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
त्यानंतर एका अपक्ष उमेदवाराला आम्ही पुरस्कृत करू असे खा. प्रणिती शिंदे यांनी सांगितले. पण घडले भलतेच. त्याच दिवशी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे बैठक घेऊन उमेदवार फायनल केला. ठरल्याप्रमाणे त्या उमेदवाराने आपला अर्ज कायम ठेवला. त्याचवेळी राशपचे जीवन जानकर यांनाही अर्ज भरण्यास सांगितले होते. पण त्यांना अर्ज काढून घेण्यास सांगण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा मविआात ठिणगी पडली. तर भाजप उमेदवाराचा अर्ज बाद करण्यासाठी…
चक्क मविआतील दोन आमदार उपस्थित होते. त्यामुळेही मोठी अस्वस्थता पसरली होती. मतांची गोळा बेरीज करणे महाविकास आघाडीच्या आवाक्याबाहेर आहे. आघाडीतील तीन पक्षातील नेत्यांची तोंडे तीन दिशेला झाली आहेत. तरीही मविआतील नेत्यांना चमत्काराची आशा आहे.
देशमुखांचे वसंत आम्हाला नाही पसंत
काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यानंतर आधीच राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एबी फॉर्म भरलेल्या वसंतराव देशमुख यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली. राशपचे जीवन जानकर यांनाही उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता. परंतु ऐनवेळी जीवन जानकर यांना अर्ज माघारी घ्यायला सांगून वसंतराव देशमुख यांची उमेदवारी फायनल करण्यात आली. त्यामुळे संतापलेल्या आ. जानकर यांनी आपल्याच पक्षाच्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार नाही. आम्ही कोणालाही मतदान करू पण देशमुखांचे वसंत आम्हाला नाही पसंत अशीच भूमिका घेतली.
Source link



