Uncategorized
Solapur News | नीरा कालव्याला पाणी सोडण्याचे जलसंपदा मंत्र्यांचे आदेश

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री यांची भेट
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे व पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर व्हावी यासाठी नीरा उजवा कालव्याच्या शाखा नं. ४ व ५ मधून पाण्याचे आवर्तन तत्काळ सोडण्याची मागणी विधानसभा सदस्य डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली असता मंत्र्यांनी तत्काळ फोनद्वारे पाणी सोडण्याचे आदेश दिले असून पुढील काही वेळात पाणी सुटणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मंगळवारी मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत मतदारसंघातील सध्याची स्थिती निदर्शनास आणून देताना वाकी, शिवणे, चिंचोली, एखतपूर, अजनाळे, कमलापूर, शेळकेवाडी, सांगोला व परिसरातील लाभधारक शेतकऱ्यांना नीरा उजवा कालव्यावर मोठी अपेक्षा असून या कालव्याच्या पाण्यावर डाळिंब, बोरे, आंबा, केळी अशा बागायती पिकांसह इतर पिके घेतली जातात.
पाण्याअभावी दुष्काळासारखी स्थिती निर्माण झाली असून सध्या कालव्यामध्ये अपेक्षित पाणी नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पाणी मिळत नसल्याने पिकांना पाणी देणे कठीण झाले असल्याचे सांगितले. यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली असून पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
विशेषतः कांदा, ज्वारी, डाळिंब आदी पिके यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून तत्काळ पाणी सोडण्याची विनंती मंत्र्यांकडे केली. या बाबीचा तत्काळ विचार करून मंत्र्यांनी तत्काळ फोन लावत पाणी सोडण्याचे आदेश दिले.
यामुळे पाणी सुटण्याचा मार्ग मोकळा झाला असून यावर तत्काळ दखल घेतल्याबद्दल आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदा मंत्री व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे आभार मानले.
Source link



