Ram Temple donation scam आठ आरोपींच्या घरांवर एकाचवेळी छापे अयोध्या राम मंदिरातील देणगी अपहारप्रकरणी कुटुंबियांची चौकशी

► वृत्तसंस्था
अयोध्या
राम मंदिरातील वस्तू व देणगी चोरी प्रकरणात तुरुंगात असलेल्या आठ आरोपींच्या घरांवर पोलिसांनी रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून छापासत्र राबविले. पोलिसांच्या आठ पथकांनी एकाचवेळी आरोपींच्या घरांवर छापे टाकले. यावेळी तीन आरोपींची घरे बंद असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी शेजाऱ्यांची चौकशी केली. तसेच अन्य आरोपींच्या घरातील कुटुंबियांची कसून चौकशी करण्यात आली. त्याव्यतिरिक्त ठराविक आरोपींच्या घरात शोधमोहीम राबवत किमती दस्तावेजांची तपासणी करण्यात आली.
राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरण सर्व आठ आरोपींविरोधात 26 जून रोजी अयोध्या पोलिसांनी रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना तुरुंगात पाठवले होते. आतापर्यंत अंदाजे 80 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. यापाठोपाठ, आरोपींच्या घरांची झडती घेऊन आणि त्यांच्या कुटुंबीयांची चौकशी करून पुरावे गोळा केले जात आहेत.
तपासादरम्यान, स्थानिक रहिवाशांनाही पोलिसांसमोर त्यांचे जबाब आणि पुरावे सादर करण्याची संधी दिली जात आहे. तपासात कोणताही व्यत्यय येऊ नये आणि अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी तपासादरम्यान आरोपींच्या घरांच्या प्रवेशद्वारांवर पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. पोलीस आता पुरावे गोळा करण्यात आणि प्रकरणाचा पुढील तपास करण्यात व्यग्र आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केली SIT
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या निर्देशानुसार स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) प्राथमिक अहवाल मिळाल्यानंतर पोलीस कारवाई तीव्र झाली आहे. राम मंदिर ट्रस्टने नोटा मोजण्यासाठी कामावर ठेवलेल्या आठ व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. रामशंकर उर्फ टिन्नू यादव, अनुकूल मिश्रा, लवकुश मिश्रा, सुभाष चंद्र श्रीवास्तव, करुणेश पांडे, मनीष यादव, अविनाश शुक्ला आणि रामाशंकर मिश्रा अशी संबंधित आरोपींची नावे आहेत.
अविनाश शुक्लाचे घर सील
पोलिसांनी कौशलपुरी फेज-1 मधील आरोपी अविनाश शुक्लाच्या भाड्याच्या घरावरही कारवाई केली आहे. तपासादरम्यान, घराचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून परिसर पोलिसांच्या निगराणीखाली ठेवण्यात आला आहे. पोलीस घटनास्थळी घटनेचा तपास करत आहेत. आतापर्यंत या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या रकमेपैकी सर्वाधिक रक्कम, अंदाजे 20 लाख रुपये, अविनाश शुक्लाकडे सापडली आहे. पोलीस सर्व आरोपींच्या निवासस्थानी पुरावे गोळा करत असून सखोल तपास करत आहेत.
Source link



