Kolhapur Success Story | भाजी विक्रेता, वडापाव विक्रेता ते ‘आरोग्य सेवक’; कोल्हापूरच्या मोहन ढवळेची जिद्दीची झेप!

संघर्षातून यशाचं शिखर गाठणारा मोहन ढवळे
कोल्हापूर : जिद्द आणि चिकाटीअसेल तर कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे कोल्हापूरच्या मोहन बसुंधरा प्रकाश ढवळे याने सिद्ध करून दाखवले आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषद येथे ग्राम आरोग्य निरीक्षक’ (आरोग्य सेवक) पदावर त्याची निवड झाली असून, त्याच्या या यशाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे. या यशाबद्दल गवळी समाजाच्या बतीने नुकतीच शनिवार पेठेतील गवळी गल्ली येथे मोहनची भव्य अभिनंदन रॅली काढण्यात आली.
कष्टाची भाकरी आणि अभ्यासाची ओढ
मोहनचा इथपर्यंतचा प्रवास अत्यंत खडतर होता. त्याने अनेक आघाड्यांवर संघर्ष केला. सकाळी भाजीपाला विकणे, दुपारी भवानी मंडप येथे आपल्या आई आणि भावाला वडापावच्या गाडीवर मदत करणे, त्यानंतर ट्रॅव्हल्सचे तिकीट बुकिंग करणे आणि रात्री झोमॅटो डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करणे अशा विविध जबाबदाऱ्या तो पार पाडत होता. या धावपळीतून बेळ काढून रात्री १२ ते पहाटे ६वाजेपर्यंत मुस्लिम बोडिंग,अभ्यासिकाच्या स्टडी रूममध्येसातत्याने अभ्यास करत असे.
खेळाने दिली यशाची साथ केवळ अभ्यासच नव्हेतर क्रीडा क्षेत्रातही मोहनने आपली मोहोर उमटवली आहे.२०१८-१९ पासून तो वुशू या खेळात सक्रीय होता. सलग चार वर्षे या खेळात त्याने मिळवलेले नैपुण्य आणि त्या आधारे मिळालेले आरक्षण त्याच्या निवडीसाठी महत्त्वपूर्ण ठरले.त्याला वुशू असोसिएशन ऑ फ कोल्हापूर डिस्ट्रिक्टचे प्रमुख प्रशिक्षक अविनाश पाटील आणि सतीश वडणगेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
मान्यवरांकडून गौरव
मोहनच्या या यशाची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते हेमंत कदिकर (आण्णा), नगरसेविका दीपा काटकर, नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे आणि माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, मित्रपरिवार यांनी त्याचे विशेष अभिनंदन करून गुणगौरव केला, आपल्या यशाचे श्रेय मोहनने त्याचे आई-वडील, मार्गदर्शक, मित्रपरिवार आणि खडतर परिश्रमाला दिले आहे.
Source link


