Kolhapur News | कोल्हापुरात नद्यांवरील उपसाबंदीमुळे शेतकरी आक्रमक; पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाला घातला घेराव!

कोल्हापूर -सध्या राज्यभरात पाणीटंचाई जाणवत असल्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभागाने पंचगंगा, भोगावती, दूधगंगा अशा प्रमुख नद्यांवर पुन्हा उपसाबंदी लागू केली आहे. या निर्णयाला कोल्हापूरच्या अब्दुललाट परिसरातील शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला आहे. शेतीसाठी पाणी नसल्याने या उपसाबंदी निर्णयाविरोधात अब्दुललाट, शिरदवाड, शिवनाकवाडी, शिरढोण, टाकवडे, तेरवाड आणि हेरवाड या भागातील खाजगी पंपधारक आणि सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी आक्रमक झाले आहेत.
त्यामुळे शेतकरी विकास समितीच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी कोल्हापुरात पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर घेराव घातला. यावेळी शेतकऱ्यांकडून उपसाबंदी निर्णय तात्काळ मागे घेण्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांची भेट न झाल्याने त्यांच्या दालनाबाहेर शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. तर सकारात्मक निर्णय झाल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. यावेळी उपसाबंदी आदेश शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे तो निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
Source link



