India-Pakistan Hockey Championship today

पुढील फेरीसाठी दोन्ही संघांची प्रतिष्ठा पणाला, दोघांनाही विजय मिळविणे आवश्यक, पण भारताचे पारडे जड
वृत्तसंस्था,
अॅम्स्टलव्हीन : एफआयएच पुऊष हॉकी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी आज, 19 ऑगस्ट रोजी आमनेसामने येणार आहेत. पूल ‘अ’मधील हा अत्यंत महत्त्वाचा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.30 वाजता सुरू होणार असून, दोन्ही संघांसाठी पुढील फेरीच्या दृष्टीने या सामन्याला विशेष महत्त्व आहे. हा सामना येथील वॅगेनर हॉकी स्टेडियमवर होणार आहे.
भारताने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात वेल्सचा 3-1 असा पराभव करत दमदार सुऊवात केली. मात्र दुसऱ्या सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडकडून भारताला 2-4 पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे दोन सामन्यांत भारताच्या खात्यात तीन गुण आहेत. इंग्लंडने दोन्ही सामने जिंकून आपले स्थान मजबूत केले आहे.
भारतासाठी पाकिस्तानविऊद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. इंग्लंडविऊद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या बचावातील त्रुटी आणि पेनल्टी कॉर्नरच्या संधींचे गोलमध्ये रूपांतर न होणे ही चिंतेची बाब ठरली आहे. इंग्लंडविऊद्ध भारताने पहिल्या अर्ध्यात चांगला खेळ करत आघाडी घेतली होती; मात्र दुसऱ्या अर्ध्यात तीन गोल स्वीकारल्याने सामना हातातून निसटला. त्यामुळे पाकिस्तानविऊद्ध बचाव अधिक भक्कम करण्याचे आव्हान भारतासमोर आहे.
दुसरीकडे, पाकिस्तानने स्पर्धेत आतापर्यंत एक पराभव आणि एक बरोबरी अशी कामगिरी केली आहे. इंग्लंडने पाकिस्तानचा 4-1 असा पराभव केला, तर त्यानंतर पाकिस्तानने वेल्सविऊद्ध 3-3 बरोबरी साधली. त्यामुळे पाकिस्तानच्या खात्यात केवळ एक गुण आहे. भारताविऊद्ध विजय मिळविल्यासच त्यांचे पुढील फेरीतील आव्हान कायम राहणार आहे.
भारताचे पाकिस्तानवर वर्चस्व
अलीकडील सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर स्पष्ट वर्चस्व राखले आहे. यंदाच्या प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात भारताने पाकिस्तानला 7-1 आणि 4-3 असे पराभूत केले होते. त्यामुळे आत्मविश्वासाच्या बाबतीत भारतीय संघाचे पारडे वरचढ आहे. पाकिस्तानने भारताविऊद्ध अखेरचा विजय 2016 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत मिळवला होता. त्यानंतरच्या काळात भारताने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र भारत-पाकिस्तान सामन्याला नेहमीच वेगळे महत्त्व असते. त्यामुळे मागील निकाल किंवा क्रमवारीपेक्षा मैदानावरील कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
पाकिस्तान आठ वर्षांनंतर विश्वचषकात
चार वेळचा विश्वविजेता पाकिस्तान तब्बल आठ वर्षांनंतर हॉकी विश्वचषकात पुनरागमन करत आहे. 2014 आणि 2023 च्या विश्वचषकासाठी पाकिस्तान पात्र ठरला नव्हता. दुसरीकडे भारताने मागील दोन ऑलिम्पिकमध्ये पदके जिंकली असून, यंदाच्या विश्वचषकात 51 वर्षांचा विश्वचषक विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचे भारतीय संघाचे लक्ष्य आहे.
भावनांवर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे
भारत-पाकिस्तान सामना म्हटला की मैदानावरील वातावरण नेहमीच तापलेले असते. मात्र विश्वचषकाच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर दोन्ही संघांना भावनांवर नियंत्रण ठेवत रणनीतीनुसार खेळ करावा लागणार आहे. भारताचा अनुभवी खेळाडू मनप्रीत सिंगने पाकिस्तानला कमी लेखणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग करत असून, पेनल्टी कॉर्नरच्या माध्यमातून गोल करण्याची त्याची क्षमता भारतासाठी महत्त्वाची ठरू शकते. वेल्सविऊद्ध भारताच्या 3-1 विजयात हरमनप्रीतने दोन गोल केले होते.
नवीन स्वरूपामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा
यंदाच्या विश्वचषकाचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. 16 संघांना चार पूलमध्ये विभागण्यात आले आहे. प्रत्येक संघ पूलमध्ये तीन सामने खेळणार आहे. प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ पुढील गटात प्रवेश करतील, तर उर्वरित संघ वर्गीकरणाच्या गटात जातील. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा निकाल पुढील फेरीतील समीकरणांवर मोठा परिणाम करू शकतो. भारताला पाकिस्तानविऊद्ध विजय मिळवून पुढील फेरीतील आपले स्थान मजबूत करण्याची संधी आहे. त्यामुळे आजचा सामना केवळ दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढत न राहता विश्वचषकातील पुढील प्रवास निश्चित करणारा निर्णायक सामना ठरणार आहे.
सामन्याची वेळ : सायंकाळी 6.30 वाजता
इंग्लंडचा भारतावर विजय
विश्वचषक हॉकी स्पर्धेत ड गटातील खेळविण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने भारतीय हॉकी संघाचा 4-2 अशा गोलफरकाने पराभव करत आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या स्पर्धेतील हा इंग्लंडचा सलग दुसरा विजय आहे. या सामन्यात 13 व्या मिनिटाला निकोलास बंर्दुकने इंग्लंडचे खाते उघडले. त्यानंतर 16 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने तसेच 24 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल नोंदवून भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र उत्तरार्धात इंग्लंडने आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर देत दोन गोल नोंदविले. 38 व्या मिनिटाला स्टुअर्ट रश्मेरीने तर 42 व्या मिनिटाला हेन्री क्रॉप्टने इंग्लंडतर्फे गोल केले. 54 व्या मिनिटाला निकोलास बंर्दुकने संघाचा चौथा आणि वैयक्तिक दुसरा गोल नोंदवून भारताचे आव्हान 4-2 असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत आता ड गटात इंग्लंडचा संघ दोन सामन्यांतून 6 गुणांसह आघाडीवर आहे. तर भारताने दोन सामन्यांतून 3 गुण मिळविले आहे.
Source link



