Uncategorized

Gokul Election 2026, Shivajirao Patil: महायुतीचे नेते आम्हाला ग्राह्य धरत नाहीत; भाजप आमदाराची नाराजी

                         शिवाजीराव पाटील यांची घणाघाती टीका

कोल्हापूर : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. महायुतीच्या अंतर्गत बैठकीवरून भाजपचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, थेट राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सडकून टीका केली आहे. “महायुतीचे नेते जर मला गृहीत धरणार नसतील, तर आता सतेज पाटील आम्हाला लांबचे राहिलेले नाहीत,” असा थेट इशारा आमदार पाटील यांनी दिला आहे, ज्यामुळे महायुतीत मोठी ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

महायुतीच्या बैठकीतून डावलल्याने तीव्र संताप

गोकुळ निवडणुकीच्या संदर्भात महायुतीच्या प्रमुख नेत्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक आणि सुमित कदम आदी नेते उपस्थित होते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण आमदार शिवाजीराव पाटील यांना देण्यात आले नव्हते.

यावरून आपली नाराजी उघड करत आमदार पाटील म्हणाले, “ज्यांचा या निवडणुकीशी काहीही संबंध नाही, त्यांना सुद्धा महायुतीच्या बैठकीला आवर्जून बोलावण्यात आलं. पण मला मात्र डावलण्यात आलं. आम्हाला देखील भावना आहेत, आम्ही किती सहन करायचं? जर हे लोक मला गृहीतच धरत नसतील, तर मला सतेज पाटील अजिबात लांबचे नाहीत.”

मंत्री हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत दादांवर थेट निशाणा

आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुतीमधील दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर थेट हल्लाबोल करताना ते म्हणाले, “गोकुळमध्ये तुमचा मुलगा चेअरमन, तुम्ही राज्याचे मंत्री… हे सगळं असं राजकारण स्वतःभोवतीच फिरवणार असेल तर सामान्य शेतकऱ्याच्या मुलांनी नेमकं कुठे जायचं?”

तर दुसरीकडे, आपल्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही त्यांनी खंत व्यक्त केली. “चंद्रकांत दादांनी चंदगडसाठी काहीही केलेलं नाही. दादा सध्या मुश्रीफ साहेबांना सोबत घेऊन चालले आहेत, पण भाजप म्हणून त्यांनी एकाही कार्यकर्त्याला जवळ केलेलं नाही. हे लोक अशा पद्धतीने वागून भाजप संपवायला निघाले आहेत,” असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशापुढे जाणार नाही’

एकीकडे स्थानिक पातळीवरील नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावरील आपली निष्ठा कायम असल्याचं स्पष्ट केलं आहे. “माझे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकदा आदेश दिला की मी त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. पण स्थानिक पातळीवर चालू असलेली ही वागणूक आता सहन करण्यापलीकडे गेली आहे,” असेही पाटील यांनी शेवटी स्पष्ट केले.

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कोल्हापूरच्या आणि विशेषतः गोकुळच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​