Fishing Ban in Maharashtra राज्यात 15 ऑगस्टपर्यंत मासेमारीस बंदी, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची माहिती

त.भा.प्रतिनिधी, मुंबई
राज्यातील मत्स्यसाठ्याचे संवर्धन, माशांना प्रजननासाठी अधिक कालावधी उपलब्ध करून देणे तसेच पावसाळ्यातील खराब हवामानामुळे मच्छीमारांची जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी राज्य सरकारने पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढवून 15 ऑगस्टपर्यंत करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. राज्याच्या क्षेत्रात यापूर्वी 1 जून ते 31 जुलै या 61 दिवसांच्या कालावधीत यांत्रिक आणि यंत्रचलित मासेमारी नौकांना बंदी होती.
पश्चिम मान्सूनचे आगमन, मत्स्यसाठ्याचे संरक्षण आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र, मासेमारी हंगामाच्या सुरुवातीला लहान माशांची होणारी मासेमारी रोखण्यासाठी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवावा, अशी मागणी विविध मच्छीमार सहकारी संस्थांकडून करण्यात आली होती.
नितेश राणेंनी काय माहिती दिली
या मागणीच्या अनुषंगाने जिल्हा समिती तसेच राज्य सल्लागार आणि सनियंत्रण समितीचे अहवाल मागविण्यात आले. या समित्यांनीही बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा अभिप्राय दिला, असे राणे यांनी सांगितले.
वाढीव बंदीमुळे मत्स्यसाठ्याचे जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल. माशांना प्रजननासाठी पुरेसा कालावधी मिळेल. तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी मत्स्यसंपदा टिकवून ठेवणे शक्य होईल. याशिवाय पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे वादळी वारे, चक्रीवादळे, अवकाळी पाऊस आणि खराब हवामानामुळे होणारी संभाव्य जीवित आणि वित्तहानीही टाळता येणार असल्याचे राणे म्हणाले.
…तर मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई
दरम्यान, राज्यात बंदी लागू असताना इतर राज्यांतील मासेमारी नौका महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर येऊन अनधिकृत मासेमारी करत असल्यास त्यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाकडून कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राणे यांनी यावेळी दिला.
Source link



