Bangkok Fire पबमधील अग्नितांडवात बँकॉकमध्ये 27 मृत्युमुखी, पार्टीत सहभागी झालेले 60 हून अधिक लोक जखमी

► वृत्तसंस्था बँकॉक
थायलंडची राजधानी बँकॉक येथील एका पबमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या अग्नितांडवात 27 जणांचा मृत्यू झाला. तसेच अन्य 63 जण जखमी झाले. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीच्या कारणाचा तपास सुरू आहे. तथापि, विद्युत प्रणालीतील बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
आगीत पब अँड बारमधील फर्निचर, भिंती आणि छत पूर्णपणे काळे पडले असून छताचे काही भागही उखडल्याचे दिसून येत होते. पबमध्ये पार्टी सुरू असताना रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्नितांडवाची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर काही मिनिटातच जवान घटनास्थळी दाखल झाले.
सुमारे 30 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले, परंतु तोपर्यंत इमारतीचा मोठा भाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता, असे अग्निशमन दलाने सांगितले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये घटनास्थळावरून उंच ज्वाळा उसळताना आणि लोक बाहेर पळताना दिसत होते. आगीनंतर पबच्या आतील फोटोंमध्ये फर्निचर, भिंती आणि छत पूर्णपणे जळालेले आणि काळे पडलेले दिसत होते.
वीज जाण्यापूर्वी स्टेजजवळील सर्किट ब्रेकरमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर एक स्फोट झाला आणि संपूर्ण पब धुराने भरून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले. अनेक लोक सुरक्षिततेसाठी इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या स्वच्छतागृहांमध्ये धावले. मात्र, आग आणि धुरामुळे बाहेर पडणे अशक्य झाल्याने त्यांचा गुदमरून मृत्यू झाला. थायलंडचे पंतप्रधान अनुतिन चर्नविराकुल यांनी घटनास्थळी भेट देत जखमींना वैद्यकीय मदत पुरविण्याचे निर्देश दिले.
अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण
मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने सुमारे अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले, परंतु तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. हा पब-बार बँकॉकच्या चाटुचक जिह्यात आहे. स्थानिक पातळीवर ‘रॉंग बीअर ना लाट फ्राओ’ म्हणून ओळखले जाणारे हे या भागातील एक लोकप्रिय रेस्टॉरंट आणि मनोरंजनाचे ठिकाण आहे. आग विझल्यानंतर काढलेल्या फोटोंमध्ये बारच्या बाहेर मोठ्या संख्येने मृतदेहांच्या पिशव्यांची (बॉडी बॅग्ज) रांग निदर्शनास येत होती. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील केला आहे.
सजावटीमुळे आगीचा भडका
पबच्या छतावरील ज्वलनशील सजावटीमुळे आग वेगाने पसरली असावी, असे बँकॉकचे गव्हर्नर चाडचार्ट सिट्टीपुंट म्हणाले. तसेच इमारतीच्या आपत्कालीन बाहेर पडण्याच्या मार्गांजवळ काही लोक बेशुद्ध अवस्थेत आढळल्यामुळे हे मार्ग बंद असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. तथापि, फॉरेन्सिक तपास पूर्ण झाल्यावरच याची पुष्टी होऊ शकेल, असे ते म्हणाले.
Source link



