Attack on Assam Rifles camp in Manipur

जमावाकडून वाहनांची जाळपोळ : शोधमोहिमेनंतर भडकली हिंसा
वृत्तसंस्था, सेनापती
मणिपूरच्या सेनापती जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या एका कॅम्पवर मंगळवारी रात्री हिंसक जमावाने हल्ला केला आहे. जमावाने कॅम्पवर दगडफेक करत तोडफोड केली आणि सुरक्षा दलांच्या तीन वाहनांना पेटवून दिले आहे. आसाम रायफल्सने विश्वसनीय गुप्तचर माहितीच्या आधारावर शोधमोहीम राबविल्यावर हा प्रकार घडला आहे. माकुइलोंगदी भागात उग्रवादी लपल्याची माहिती आसाम रायफल्सला प्राप्त झाली होती. हे स्थान एनएससीएन (आयएम)च्या ओकलोंग येथील निर्धारित कॅम्पपासून सुमारे 2 किलोमीटर अंतरावर आहे. याच माहितीच्या आधारावर या भागात गस्त अन् शोधमोहीम सुरू करण्यात आली होती.काही उग्रवादी निर्धारित कॅम्पच्या बाहेर शस्त्रास्त्रs अन् गणवेशासह फिरत असल्याची गुप्तचर माहिती प्राप्त झाली होती. हा प्रकार संघर्षविरामाच्या नियमांचे उल्लंघन करणारा मानला गेला. यासंबंधी सीजफायर मॉनिटरिंग ग्रूपलाही (सीएफएमजी) औपचारिक माहिती देण्यात आली असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकांनी रोखली शोधमोहीम
शोधमोहिमेच्या दरम्यान आसाम रायफल्सची टीम माकुइलोंगदी आणि ओकलोंग गावांच्या दिशेने सरकताच स्थानिक लोकांनी जवानांना पुढे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, यामुळे तेथे तणाव वाढला. तर सेनापती शहरात मोठ्या संख्येत लोक एकत्र येत असल्याचे आणि आसाम रायफल्सच्या कॅम्पच्या दिशेने जाण्याची तयारी करत असल्याची माहिती मिळाल्याने सुरक्षा दलांची टीम शोधमोहिमेतून परतली. तरीही रात्री मोठा जमाव आसाम रायफल्सच्या कॅम्पपर्यंत पोहोचला आणि दगडफेक करू लागला. जमावाने कॅम्पच्या संपत्तीला नुकसान पोहोचविण्यासह जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला.
सीआरपीएफच्या तुकड्या दाखल
स्थिती बिघडल्यावर आसाम रायफल्सने मणिपूर पोलिसांसोबत मिळून जमावाला पांगविण्यासाठी किमान बळाचा वापर केला. यानंतर सेनापती पोलीस आणि सीआरपीएफच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी पाठविण्यात आल्या, ज्यानंतर स्थितीवर नियंत्रण मिळविता आले आहे. सध्या याप्रकरणी चौकशी केली जात असून परिसरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
Source link



