Uncategorized

समुद्रातील नियमबाह्य मासेमारीला लगाम घाला; देवगड रापण संघाचे मत्स्य परवाना अधिकारी किरण वाघमारे यांना निवेदन

देवगड / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रकिनारी नियमबाह्य पद्धतीने सुरू असलेल्या पर्ससीन नेट आणि मिनी पर्ससीन नेट मासेमारीवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पारंपरिक बिगर यांत्रिकी रापण संघ, देवगड यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास परवाना अधिकारी किरण वाघमारे यांची भेट घेऊन निवेदन साद केले.

देवगड परिसरातील पारंपरिक मच्छीमार समाजातील अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह पिढ्यान्‌पिढ्या पारंपरिक मासेमारीवर अवलंबून आहे. रापण पद्धतीच्या मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांसह कामगारांना रोजगार मिळतो. मात्र पर्ससीन नेट आणि मिनी पर्ससीन नेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्याने पारंपरिक मच्छीमारांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होत असल्याचे संघाने निवेदनात नमूद केले आहे.

पर्ससीन नेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासळी पकडली जात असल्याने पारंपरिक मच्छीमारांना उपलब्ध होणाऱ्या मासळीवर परिणाम होत आहे. त्यामुळे त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून, भविष्यात बेरोजगारीचे संकटही निर्माण होण्याची शक्यता संघाने व्यक्त केली आहे.

नियमबाह्य मासेमारीवर कठोर कारवाईची मागणी

पारंपरिक मच्छीमारांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्याबरोबरच समुद्रातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे संघाने म्हटले आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक मासेमारी क्षेत्रात सुरू असलेल्या नियमबाह्य मिनी पर्ससीन नेट व पर्ससीन नेट मासेमारीची तात्काळ पाहणी करून दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच रापण संघाच्या हद्दीत होणाऱ्या नियमबाह्य मासेमारीवर प्रभावी नियंत्रण आणून पारंपरिक मच्छीमारांच्या हिताचे संरक्षण करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रापण संघाने दिला आहे.

यावेळी रापण संघाचे विश्वास भुजबळ, शशिकांत लब्दे, संतोष लब्दे, दिनेश धुवाळी, उत्तम जोईल, अनिल जोईल, संतोष कातवणकर, अशोक पेडणेकर, शामराव शिंदे, वाडेकर, ठुकरूल तसेच विजयदुर्ग-मुणगे परिसरातील अन्य पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी अधिकारी किरण वाघमारे यांच्याकडे निवेदन साद करून या प्रश्नावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​