Uncategorized

कणकवली, सावंतवाडीतील बंद सिटीस्कॅन सुविधा तातडीने सुरू करा; राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे मागणी

कणकवली / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमधील बंद असलेली मोफत सिटीस्कॅन सुविधा तातडीने सुरू करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे. गोवा दौऱ्यावर आलेल्या सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन नाईक यांनी याबाबतचे निवेदन सादर केले.

कणकवली आणि सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयांमध्ये कृष्णा डायग्नोस्टिक लिमिटेड या कंपनीमार्फत मागील वर्षभरापासून मोफत सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या सुविधेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होत होता. मात्र, शासनाकडून संबंधित कंपनीला देय रक्कम न मिळाल्याने ही सुविधा बंद करण्यात आल्याचे नाईक यांनी निवेदनात म्हटले आहे.

आरोग्य विभागाकडून एक्स-रे, सिटीस्कॅन, एमआरआय यांसह राज्यभरातील विविध सेवांपोटी संबंधित कंपनीला सुमारे 56 कोटी रुपये देणे बाकी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनीने सिंधुदुर्गातील मोफत सिटीस्कॅन सेवा बंद केली असून, त्याचा थेट आर्थिक फटका जिल्ह्यातील गरीब रुग्णांना बसत आहे.

“मोफत सिटीस्कॅन सुविधा बंद झाल्यामुळे गरजू रुग्णांना खासगी केंद्रांमध्ये महागड्या तपासण्या कराव्या लागत आहेत. त्यामुळे शासनाने संबंधित कंपनीची काही थकीत रक्कम अदा करून कणकवली आणि सावंतवाडी रुग्णालयांतील सुविधा पुन्हा सुरू करावी,” अशी मागणी अबिद नाईक यांनी केली.

या प्रकरणी आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करून संबंधित कंपनीला काही रक्कम अदा करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, तसेच येत्या आठवड्यात सिटीस्कॅन सुविधा सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन सुनेत्रा पवार यांनी दिल्याचे नाईक यांनी सांगितले.

दरम्यान, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनीही या प्रश्नाबाबत आरोग्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यामुळे शासनाकडून आता प्रत्यक्ष कोणती कार्यवाही केली जाते आणि दोन्ही रुग्णालयांमधील मोफत सिटीस्कॅन सुविधा कधी सुरू होते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​