Uncategorized

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहून योगी वेगळा असतो

भगवंत म्हणाले, योगीकुळात जन्मलेला योगी योगाभ्यासाकडे खेचला गेल्याने तो योगमार्गाने निघाल्यावर पापापासून शुद्ध होऊन अनेक जन्मी संपूर्ण होत होत मोक्षपदी विराजमान होतो. विश्वाची निर्मिती करणे आणि कालांतराने ते पुन्हा आपल्यातच सामावून घेणे हा ईश्वराचा खेळ त्याच्या मर्जीनुसार नेहमीच चालू असतो पण योगाभ्यासाच्या जोरावर, योगी ईश्वराशी एकरूप होतो. त्यासाठी योगाचे चिकाटीने अनुष्ठान करतो. ह्या सर्व अथक प्रयत्नांनंतर साधकाचे सिद्धात रुपांतर होते आणि तो ज्या स्वरूपातून येथे आलेला असतो ते आत्मस्वरूप त्याला प्राप्त होते. हे सर्व तो पौरुष प्रयत्नाने साध्य करत असल्याने ईश्वराशी एकरूपता साधल्यावर तो देहात असतानाच ईश्वरस्वरूप होतो. हेच योगाभ्यासाचे महात्म्य होय.

अर्थात ही गोष्ट सोपी नसते हे स्पष्ट करताना माउली म्हणतात, त्यासाठी योगाचे चिकाटीने अनुष्ठान करावे लागते. ह्या तपाची बरोबरी तुटलेल्या, निराधार व निसरड्या कड्यावर चढण्याचा प्रयत्न करण्याशी करता येईल. ह्या सर्व अथक प्रयत्नानंतर साधकाचे सिद्धात रुपांतर होते आणि तो ज्या स्वरूपातून येथे आलेला असतो ते आत्मस्वरूप तो स्वत: होतो. ईश्वराच्या मर्जीनुसार प्रलय होऊन सर्व विश्वाला प्राप्त होणारी ही शेवटची गती तो स्वप्रयत्नाने कितीतरी आधी मिळवतो.

भगवंत पुढे म्हणाले, तपस्वी, ज्ञानी व कर्मी ह्यापेक्षा योगी श्रेष्ठ आहे. म्हणून अर्जुना तू योगी हो.

ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहूनि आगळा । मानिला तो असे योगी योगी होई म्हणूनि तू ।। 46 ।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, ज्ञानी तापस कर्मिष्ठ ह्या सर्वांहून योगी वेगळा असतो. म्हणून तो कर्मनिष्ठांना पूज्य आहे. ज्ञानी पुरुष त्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करतात कारण ते त्याची योग्यता जाणून असतात. तपस्वी लोकांमध्ये तो तपोनाथ आहे. योग्याला एव्हढे महत्त्व मिळण्याचे कारण म्हणजे जीव व परमात्म्याच्या ऐक्याच्या ठिकाणी त्याचे मन गुंतलेले असते. तो जरी देहधारी असला तरी त्याचा महिमा मोठा असतो. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो असे मी तुला नेहमी म्हणतो.

ज्याला योगसाधना करायची आहे त्याचा पौरुषप्रयत्नांवर विश्वास असतो हे आपण पाहिलेलं आहेच. ज्याला योगाभ्यासाची आवड असते तो योगमार्गाने पुढे जात असतो पण सगळ्यांना अशा पध्दतीने चिकाटीने ध्यानसाधना करणे शक्य नसते किंवा त्याची मनापासून आवडही नसते, अशा साधकांना ईश्वराची भक्ती करून कैवल्यसाक्षात्कार होऊ शकतो असे पातंजलयोगसुत्रातही सांगितले आहे. ते सूत्र असे आहे.

ईश्वरप्रणिधानाद्वा ।।

समाधिपाद, सूत्र 23।।

त्यानुसार पूर्ण श्रद्धेनं केलेल्या ईश्वराच्या भक्तीमुळेही असंप्रज्ञात समाधी साध्य होते किंवा ईश्वरावर असलेल्या भक्तीमुळे असंप्रज्ञात समाधी लवकर साध्य होते कारण अत्यंत प्रेमाने ईश्वर भजनात रंगलेल्यांचा भगवंत आत्मबुद्धिशी योग घडवून आणून त्यांना आत्मज्ञान प्राप्त करून देतात. म्हणून पौरूषप्रयत्नाने करत असलेल्या योगसाधनेला ईश्वरस्मरणाची जोड दिली तर योगाभ्यास जलद पूर्ण होतो.

क्रमश:


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​