Uncategorized

फ्रान्सकडून नॉर्वेचा 4-1 असा फडशा

डेम्बेलेची हॅट्ट्रिक, डेझिरे डोएकडून एक गोल, दोन्ही संघ बाद फेरीत दाखल

फ्रान्सकडून नॉर्वेचा 4-1 असा फडशा

वृत्तसंस्था, फॉक्सबोरो, मॅसॅच्युसेट्स : शुक्रवारी झालेल्या विश्वचषक सामन्यात फ्रान्सला नॉर्वेविऊद्ध 4-1 असा विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावताना डेम्बेलेने पहिल्या सत्रात हॅट्ट्रिक साधली. त्यातील एक गोल त्याने एमबाप्पेच्या पासवर केला.

2018 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या आणि चार वर्षांपूर्वी अंतिम फेरीत पराभूत झालेल्या फ्रान्सने या सामन्यापूर्वीच बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले होते. नॉर्वेचेही पुढील फेरीमधील स्थान निश्चित झाले होते आणि ते गटात दुसऱ्या स्थानावर राहिले आहेत. दुसऱ्या सत्रामधील ‘इंज्युरी टाइम’मध्ये डेझिरे डौएने फ्रान्ससाठी शेवटचा गोल केला. फ्रान्सने तीन सामन्यांत 10 गोल केले आहेत.

2025 मध्ये युरोपचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘बॅलन डी’ओर’ जिंकणाऱ्या आणि या विश्वचषकात आतापर्यंत चार गोल करणाऱ्या डेम्बेलेने 65 व्या मिनिटाला मैदान सोडले. त्याच्या जागी ब्रॅडली बारकोला मैदानात उतरला. डेम्बेलेच्या दुसऱ्या गोलनंतर नॉर्वेनेही खाते उघडले. खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर अवघ्या 14 सेकंदात त्यांनी गोल केला. मात्र त्यानंतर नऊ मिनिटांपेक्षा कमी कालावधीत डेम्बेलेने आपला तिसरा गोल करत संघाची आघाडी पुन्हा दोन गोलवर नेली.

नॉर्वेच्या सुऊवातीच्या संघात हालांदसह नियमितपणे खेळणाऱ्या 10 खेळाडूंचा समावेश नव्हता. त्यांना विश्रांती देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असावा. या मोठ्या बदलांमध्ये ओरजान नायलँडच्या जागी एगिल सेल्विकला गोलरक्षक म्हणून खेळवण्यात आले. नॉर्वेचा संघ आता टेक्सासच्या आर्लिंग्टन येथे 32 संघांच्या फेरीत आयव्हरी कोस्टचा सामना करेल. त्याच दिवशी फ्रान्सचा सामना तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या सर्वोत्तम आठ संघांपैकी एका संघाशी होईल.

सामना सुरू झाल्यानंतर अवघ्या 21 सेकंदांतच एमबाप्पेने फ्रान्ससाठी गोल करण्याची संधी निर्माण केली होती. त्याने उजव्या बाजूने वेगाने धाव घेत जोरदार फटका मारला. हा चेंडू गोलरक्षक सेल्विकच्या हाताच्या आवाक्याबाहेर जाऊन ‘क्रॉसबार’ला लागला. डेम्बेलेला आपला पहिला गोल करण्यासाठी मोकळी जागा मिळाली. त्याने एमबाप्पेकडून आलेला पास स्वीकारला आणि उजव्या पायाने जोरदार फटका मारत सेल्विकला चकवले.

डेम्बेलेच्या दुसऱ्या गोलच्या वेळी त्याला ‘बॉक्स’च्या वरच्या भागात तीन बचावपटूंच्या मधून मोकळी जागा मिळाली आणि त्याने डाव्या पायाने मारलेला फटका सेल्विकच्या बचाव करण्याच्या प्रयत्नांना हुलकावणी देत जाळीत गेला. 49 व्या मिनिटाला नॉर्वेला गोलफरक कमी करण्याची संधी मिळाली होती. यावेळी फ्रान्सचा बचावपटू थियो हर्नांडेझ याने ‘बॉक्स’मध्ये ऑस्कर बॉबला अडवून पाडले. मात्र जोर्गेन स्ट्रँड लार्सनने उजव्या कोपऱ्याच्या दिशेने मारलेला पेनल्टी फटका फ्रान्सचा गोलरक्षक माईक मेगन याने अडवून परतवून लावला.

 1994 नंतर प्रथमच पहिल्या सत्रात हॅट्ट्रिक

लायोनेल मेस्सी आणि किलियन एमबाप्पे यांच्या जोडीला आता ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत उस्मान डेम्बेलेचेही आगमन झाले आहे. डेम्बेलेने 7 व्या, 20 व्या आणि 32 व्या मिनिटाला गोल केले. 1994 मध्ये अमेरिकेत झालेल्या विश्वचषकात कॅमेरूनविऊद्धच्या सामन्यात रशियाचा आघाडीपटू ओलेग सालेन्को याने सुऊवातीच्या 45 मिनिटांत पाचपैकी तीन गोल केले होते. त्यानंतर विश्वचषकाच्या सामन्यात पहिल्या सत्रामध्ये हॅट्ट्रिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​