Uncategorized

Panchganga River | कोल्हापुरात पंचगंगेचे पात्र आटले; तब्बल… वर्षांनी ब्रह्मदेव मंदिर पूर्णपणे पात्राबाहेर, दर्शनासाठी गर्दी!

 

कोल्हापूर ( सुधाकर काशीद ) -कोल्हापुरातील पंचगंगा नदीचा घाट पाच वेगवेगळ्या विभागात पसरला आहे.पहिला घाट आईसाहेबांचा दुसरा घाट ब्राह्मणांचा. तिसरा घाट त्याचं नाव मधला घाट, चौथा पाप फेडण्याचा घाट आणि पाचवा घाट स्मशानाचा अशी त्यांची विभागणी आहे. पंचगंगेच्या घाटावर पहाटे पाचपासून वर्दळ सुरू होते. रात्रभर संथ वाहणाऱ्या नदीत पात्रात यावेळीच खळखळ सुरू होते. जून महिना निम्मा संपला तरीही पावसाचा पत्ता नाही. उन्हाळ्यामुळे पाणी पातळी कमी कमी होत आहे. आज तर पंचांगा नदीचे पाच घाट आणि नेहमी काही भाग पाण्यात असलेली मंदिरे पूर्णपणे खुली झाली आहेत.

महत्वाचा भाग हा की ज्या मंदिरामुळे पंचगंगा नदीच्या काठावरचा भाग ब्रह्मपुरी म्हणून ओळखला जातो त्या ब्रह्मदेव मंदिराचा पूर्ण भाग पाण्याबाहेर आला आहे. एरवी या घाटाचा काही भाग पाण्यात असतो त्यामुळे जवळून ब्रह्मदेवाचे दर्शन घेता येत नाही. पण आता मंदिरापर्यंतचा भाग कोरडा पडल्याने ब्रह्मदेवाच्या पायरीपर्यंतजाता येते. उद्यापासून त्याच्या दर्शनासाठी रांग लागणार हे स्पष्ट आहे.

पंचगंगा नदीचा घाट प्राचीन आहे तेराव्या शतकापासून या घाटाची नोंद दिसून येते तेराव्या शतकात शंकराचार्य विद्या शंकर भारती यांनी या मठाची स्थापना केली आणि अभिनव पंचगंगातीरावर कमला निकेतन करवीर सिंहासनाधीश्वर श्री विद्याशंकर भारती अशी बिरुदावली शंकराचार्यांना या घाटाच्या प्रतिकातून मिळाली. संन्यासाचा मठ आणि समाधीच्या समाधीची जागा एकच असते. त्यामुळे हा परिसर संन्याशींच्या समाधीचाही परिसर झाला आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू करवीरकर यांची पहिली समाधी आहे. त्यांच्या पत्नीने पहिले मंदिर बांधले. याच संभाजी महाराजांची समाधी टोप संभापूर येथेही आहे. संभाजी घाटावर चार फूट उंचीची एक मारुतीची मूर्ती आहे या मूर्तीची प्रतिष्ठापना जिजाबाईंनीच केली आहे. हेतू हा की पंचगंगेला पूर आला की पात्राबाहेर आलेले पाणी प्रथम या मारुतीच्या पायाला लागावे व पुढेतेच पाणी दिबंगत राजघराण्यातील व्यक्तींच्या समाधी पर्यंत जाऊन पोहोचावे.

पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी मोजण्याची काही परंपरागत परिमाणे घाटावर आहेत पुराचे पाणी पेरूच्या बागेत शिरले की समजायचे शुक्रवार पेठेतून शिवाजी पुलाकडे जायचा मार्ग पाण्याखाली गेला. पेरूची बाग म्हणजे प्रत्यक्षात सरदार खर्डेकर सर लष्कर निंबाळकर घराण्याची स्मशानभूमी आहे. आता त्या परिसरात स्वच्छता करण्यात आलेली आहे.याशिवाय घाटावर असलेल्या अनेक समाध्या मंदिरे व वृंदावनाच्यास्वरूपात आहेत. त्यात शिवाजी महाराजांचे नातू संभाजी महाराज, पहिले राजाराम महाराजांचे पणतू शिवाजी महाराज दुसरे, संभाजी महाराज दुसरे, सरदार डोंगरोजी यादव, विश्वासराव गायकवाड, घाटगे ज्युनिअर सरदार पाटणकर, राजाराम महाराज यांच्या या ठिकाणी समाध्या आहेत. म्हणजेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार केलेल्या जागी छोटे मोठे मंदिर उभे आहे. पंचगंगेचा हा घाट खूप रमणीय आहे आणि कोल्हापूरच्या सर्व वाटचालीचा साक्षीदार हा घाट आहे.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​