सावंतवाडी नगरपालिकेस कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्या

भाजप नगरसेविका नीलम नाईकांचे पालकमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी : प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपालिकेत कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन भाजपच्या नगरसेविका नीलम नाईक यांनी पालकमंत्री नितेश राणे यांना दिले आहे . सावंतवाडी शहरात कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक अडचणी उद्भवत आहेत अशी कैफियत या निवेदनातून त्यांनी मांडली . त्या निवेदनात म्हणतात सावंतवाडी नगरपरिषद ही संस्थानकालीन नगरपरिषद आहे व तिची निर्मिती सन १८७७ मध्ये झाली असून सुमारे १४९ वर्षे सदर नगरपरिषद अव्याहत कार्यान्वित आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील सावंतवाडी नगरपरिषद ही सर्वात जुनी व नावलौकीक प्रप्त असलेली नगरपरिषद म्हणुन प्रचलीत आहे. सावंतवाडी नगरपरिषदेचे बजेट सन २०२६ -२७ मध्ये सुमारे १४९ कोटी एवढे अंदाजीत असुन शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २३,००० एवढी होती तीच आजमितीस सुमारे ३५,००० एवढी आहे.मुख्याधिकारी हे नगरपरिषद प्रशासनाचा कणा मानला जातो असे असता नगरपरिषदेचा कारभार कायमस्वरूपी व कार्यक्षम अशा मुख्याधिकारी यांच्या मार्फत हाकणे काळाची गरज आहे. जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना पायाभूत व नागरी सुविधा उपलब्ध करून एक सुशासन देणे शक्य होईल . सध्या कार्यरत असलेले व तात्पुरता पदभार असलेल्या मुख्याधिकारी यांच्याकडे अन्य ठिकाणी सुद्धा पदभार असल्याने सावंतवाडो सारख्या तुलनेने मोठ्या असलेल्या नगरपरिषदेकरिता त्यांना सहाजिकच परिपूर्ण वेळ देता येत नाही असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे .सबब सावंतवाडी नगरपरिषदे करिता तातडीने कायमस्वरूपी “मुख्याधिकारी” यांची नेमणुक करण्यात यावी अशी मागणी नगरसेविका सौ. निलम परिमल नाईक यांनी पालकमंत्री मा. नितेशजी राणे यांच्याकडे केलेली आहे.
Source link



