लाच घेताना दोन अभियंते विजापूर लोकायुक्तांच्या जाळ्यात

18 हजार रु. स्विकारताना कारवाई : दोघांनाही न्यायालयीन कोठडी
त. भा. वार्ताहर
विजापूर : कालवा (कॅनॉल) कामाच्या बिलाच्या मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याच्या आरोपावरून कृष्णाभाग्य जलनिगम उपविभाग क्र. 1, सालोटगी येथील साहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) आणि कनिष्ठ अभियंता (जेई) यांना कर्नाटक लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे.
लोकायुक्त पोलीस ठाणे, विजापूर येथे नानासाहेब रुडगी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलाने पूर्ण केलेल्या कालवा कामाच्या 3,71,419 रकमेच्या बिलाच्या मंजुरीसाठी मोजमाप पुस्तिका तयार करून झळकी विभागाकडे पाठविण्यासाठी साहाय्यक कार्यकारी अभियंता सेवुलाल चव्हाण यांनी 10,000 रुपये लाचेची मागणी केली होती. त्याच कामाशी संबंधित कनिष्ठ अभियंता सातलिंगप्पा रोडगी यांनी 8,000 रु. लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.
तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी गुन्हा नोंदवून 5 जून रोजी सायंकाळी सालोटगी येथील केबीजेएनएल उपविभाग कार्यालयात सापळा रचून कारवाई केली. यावेळी कनिष्ठ अभियंता सातलिंगप्पा रोडगी यांनी स्वत:च्या वाट्याचे 8,000 तसेच एईई सेवुलाल चव्हाण यांच्या सांगण्यावरून त्यांच्या वाट्याचे 10,000 असे एकूण 18,000 लाचेचे पैसे स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले आणि दोघांनाही अटक केली.
अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे. ही कारवाई कर्नाटक लोकायुक्त, विजापूरचे पोलीस अधीक्षक टी. मल्लेश यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक मल्लिकार्जुन एस. तुळसिगेरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. पोलीस निरीक्षक आनंद टक्कण्णावर, आनंद दोणी, निंगप्पा पुजेरी तसेच लोकायुक्त पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेऊन ती यशस्वी केली.
Source link



