Satara News | रणदुल्लाबादमध्ये भीषण पाणीटंचाई; टँकर असूनही दहा दिवसांनी पाणीपुरवठा, ग्रामस्थ संतप्त

रणदुल्लाबादमध्ये पाण्याचा गंभीर प्रश्न
रणदुल्लाबाद – रणदुल्लाबाद गावात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी नागरिकांना तब्बल दहा-दहा दिवसांनी पाणी मिळत असल्याची गंभीर परिस्थिती आहे. यामुळे विशेषतः वृद्ध, महिला आणि आजारी नागरिकांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
गावातील एका वृद्ध दाम्पत्याला पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याचे चित्र सध्या समोर आले आहे. चालणेही कठीण असलेल्या या नागरिकांना पाण्यासाठी होणारा त्रास पाहून ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
गावात अनेक वर्षांपासून पाणी, बाजारपेठ, औद्योगिक विकास (एमआयडीसी) यांसारख्या मूलभूत सुविधांचा अभाव असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. मागील अनेक वर्षांत विविध सत्ताधाऱ्यांनी आश्वासने दिली, मात्र प्रत्यक्षात विकासकामे झालेली नाहीत, असा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.
दरम्यान, गावातील तरुणांनी विकासाच्या प्रश्नांवर एकत्र येण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. शेजारच्या भागातील काही गावांनी दूरदृष्टी आणि लोकसहभागाच्या जोरावर विकास साधला असून रणदुल्लाबादनेही त्यातून प्रेरणा घेण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
गावातील पाणीटंचाई आणि विकासाच्या प्रश्नांवर स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. सध्या तरी गावातील नागरिकांना “पाणी कधी येणार?” याचीच प्रतीक्षा लागून राहिली आहे.
Source link



