महाबळेश्वर कोकणला केबल स्टेड पुलाने जोडण्याचे काम होणार लवकरच पूर्ण…

रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांसाठी वाहतुक आणि पर्यटन आता अधिक समन्वयाचे आणि सुरळित होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड आणि सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर यांच्यातील अंतर आता ५० किलोमीटरने कमी होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणाऱ्या केबल स्टेड पुलाचे काम पूर्ण झाले आहे. हा पूल पावसाळ्यानंतर हा पूल लोकांच्या सेवेत दाखल होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच या पुलाच्या कामाची पाहणी केली.
कसा आहे मार्ग?
या प्रकल्पाची एकूण खर्च 175 कोटी असून मुंबईतील वरळी सागरी सेतूप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात अशा प्रकारचा केबल स्टेड पूल प्रथमच उभारला जात आहे. तापोळा ते कोकणच्या दिशेला गाढवली आहिर अशी या पुलाची रचना आहे. विशेष म्हणजे ५४० मीटर लांब आणि १४ मीटर रुंद असलेल्या या पुलाच्या मध्यभागी ४३ मीटर उंचीची व्ह्यू गॅलरीही उभारण्यात आली आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सुल लिफ्टची सुविधा असेल. तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असतील.
मनोहर जोशींच्या काळात प्रस्तावित मार्ग
या प्रकल्पाचे काम टी ॲण्ड टी या कंपनीकडे देण्यात आले आहे. युतीच्या काळात मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना हा पूल प्रस्तावित होता मात्र एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर या कामाला गती दिली.
पुलामुळे रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा आंबेनळी घाट मार्ग वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाट मार्ग या नव्या ब्रिजवरून पलीकडे तापोळा मार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा येथे जाता येणार आहे. त्यामुळे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे. यास मार्गावर बामणोली ते आपटी हा आणखी एक पूल उभारला जात आहे.
एकनाथ शिंदे यांचं गाव जोडलं जाणार
महाराष्ट्र टाईम्सच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांचे गाव असलेले सातारा जिल्ह्यातील दरे हे गाव ते कोयना खोऱ्यातील बामणोली गाव यांना जोडणारा आणखी एक ३०० कोटी रुपये खर्चाचा पूल उभारण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, खांदाटी खोऱ्यात राहणाऱ्या नागरिकांना या पुलाचा मोठा उपयोग होणार आहे. पावसाळ्यात धोकादायक ठरणारा कोयना बॅकवॉटरमधील बार्जचा प्रवासही या पुलामुळे टाळता येणार आहे.
Source link



