मळगाव घाटीत 50 फूट खोल दरीत कोसळली कार

अपघातांचे सत्र सुरु असूनही बांधकाम विभाग निद्रिस्त
सावंतवाडी शहर वार्ताहर
सावंतवाडी-मळगाव मार्गावर मळगाव घाटीत बुधवारी पहाटे आंबा घेऊन येणारी इको कार 50 फूट दरीत कोसळून अपघात घडला. पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यामुळे घाटातील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट दरीत कोसळली. सुदैवाने, या अपघातात कार मधील दोघेजण बालबाल बचावले मात्र अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. महिनाभरात त्याच धोकादायक वळणाच्या ठिकाणी हा दुसरा अपघात घडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर स्थानिकांनी व वाहन चालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. मातोंड पेंडूर येथून बागायतदार बुधवारी पहाटे आपल्या इको कारमधून आंबे घेऊन सावंतवाडीच्या दिशेने जात असताना मळगाव घाटातील एका तीव्र वळणावर हा अपघात घडला. पहाटे पडलेल्या पावसामुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या रुंबडाच्या झाडाची फळे रस्त्यावर पडून रस्ता निसरडा झाल्यामुळे कारचालकाचा ताबा सुटून कार कडेला घसरत पलटी घेत 50 फूट दरीत कोसळली. सुदैवाने कार मधील दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही.अपघाताची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, पेंडूर सरपंच संतोष गावडे, उमेश दळवी आदींसह स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबवले आणि कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. कारचे या अपघातात मोठे नुकसान झाले आहे. मळगाव घाटीत अपघाताची मालिका सुरूच आहे. महिनाभरापूर्वी याच ठिकाणी धोकादायक वळणावर अशाच प्रकारे सावंतवाडी शहरातील एक कार दरीत कोसळली होती. या अपघातात कुटुंबातील सात जण जखमी झाले होते.वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या भागातील सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. घाटातील तीव्र वळणे, तुटलेले संरक्षक कठडे आणि दिशादर्शक फलकांचा अभाव यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
लोकप्रतिनिधींची नाराजी
पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य करून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षित कारभारावर ताशेरे ओढले. या ठिकाणी असलेले तुटलेले रेलिंग आणि कठडे तातडीने दुरुस्त करून ते मजबूत करावेत, तसेच पावसाळ्यात निसरड्या होणाऱ्या रस्त्यावर उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी पंचायत समितीच्या मागील मासिक सभेत केली होती. यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व वन विभागाचे अधिकारी यांना सूचनाही केल्या होत्या. परंतु वीस दिवस उलटून गेले तरी संबंधित दोन्ही विभागांनी कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नसल्याने त्याबाबत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या महिन्यात पंचायत समितीची होणाऱ्या मासिक बैठकीत या प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे असे श्री गावकऱ यांनी स्पष्ट केले. अन्यथा दोन्ही विभागाच्या कार्यालयासमोर ग्रामस्थ व वाहन चालकांच्या सहकार्याने उपोषण करण्याचा इशाराही श्री गावकर यांनी दिला आहे. आज घडलेल्या कार अपघातानंतर श्री गावकर यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि अधिकाऱ्यांना धारेवर धरले. येत्या महिन्याभरात पावसाळ्याला सुरुवात होणार आहे .त्यामुळे घाटातील धोकादायक झाडांच्या फांद्या, धोकादायक झाडे तोडण्याची मागणी करून आणि भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने मळगाव घाटीतील संरक्षक गार्डरेल, वेगमर्यादा फलक आणि रिफ्लेक्टर्स बसवावेत, अशी मागणी केली आहे
Source link



