Uncategorized

सर्वांशी समबुद्धीने वागतो

अध्याय सहावा

भगवंत म्हणाले, ज्याचे चित्त समाधान पावले आहे, जो निश्चल आहे, जितेंद्रिय आहे, मातीचे ढेकूळ, दगड अथवा सुवर्ण यांचे ठिकाणी ज्याची समदृष्टी आहे, अशा गुणी व्यक्तीला योगी म्हणतात. त्याचा आत्मा त्रिगुणातून मुक्त झालेला असतो त्यामुळे त्याला सर्वत्र ब्रह्मच दिसत असते. सुखदु:ख, मानापमान ह्या माणसाच्या मनाला अस्वस्थ करणाऱ्या भावना योग्याच्या मनाला स्पर्श करत नसल्याने त्या उत्पन्न करणारे दृश्य जगत त्याच्या दृष्टीने मिथ्या ठरते व आपणच ज्ञानरूप आहोत असे त्याच्या लक्षात येते. त्याला सगळ्या वस्तू परब्रह्मस्वरूप दिसत असतात. कसलीही इच्छा नसल्याने त्याला कशातच गम्य नसते. हितचिंतक, मित्र, शत्रु, उदासीन, दोन्ही पक्षांचे हित इच्छिणारे मध्यस्थ, प्रिय, अप्रिय, नातलग, सज्जन, पापी, या सर्वांचे ठिकाणी समबुद्धीने पाहणारा योगी सर्वांत श्रेष्ठ ठरतो ह्या अर्थाचा

शत्रू मित्र उदासीन मध्यस्थ परका सखा । असो साधु असो पापी सम पाहे विशेष तो ।। 9 ।। हा श्लोक आपण पहात आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, त्याला समोरची सर्व माणसे वेगवेगळी दिसत असली तरी त्याला ती सर्व परब्रह्माची सगुण रूपे वाटत असल्याने त्याला ती हितचिंतक, शत्रू, मित्र अशी वेगवेगळी वाटत नाहीत. मीच विश्व आहे, अशी प्रचिती ज्यास आली आहे त्याला नातलग कोण आणि कशाचा? व त्याला वैरी तरी कोण वाटणार? आणि चांगले, वाईट तरी काय असणार? त्याला सगळं सारखंच असतं. ज्याप्रमाणे लोखंडाला एकदा परिसाने स्पर्श केला की त्या लोखंडाचे शुद्ध सोन्यात परिवर्तन होते किंवा एकदा खोल पाण्यात गेल्यावर त्याला सर्वत्र पाणीच दिसत असते. त्यात डावे उजवे असे काही असत नाही. त्याप्रमाणे एकदा योग्याला ब्रह्मप्राप्ती होऊन सर्व जग ब्रह्मस्वरूप दिसू लागले की, त्याला कुणाच्यात कोणताही फरक वाटत नाही किंवा कुंभाराने मातीची चित्रे तयार केली तरी त्याच्या दृष्टीने ती सर्व मातीचीच असल्याने त्यात त्याला काहीच फरक वाटत नाही.

योगी सर्वांविषयी सारखेपणा बाळगत असल्यामुळे त्याच्या बुद्धीमध्ये चराचराविषयीच्या समतेचा निरंतर उदय होत असतो. समजा सोन्याचे निरनिराळे प्राणि तयार केले तरी त्या सर्वात चोख सोनेच असते त्याप्रमाणे प्राण्यांचे आकार वेगवेगळे दिसत असले तरी सगळ्यात असलेले परब्रह्मरूप एकसारखेच असते. हे जाणून असल्याने तो वरवरच्या नाना प्रकारच्या आकारांना फसत नाही. समजा एखाद्या कापडाकडे नजर टाकली तर त्यामध्ये जी कलाकुसर केलेली असते ती सर्व त्या वस्त्रातील धाग्यांचीच कमल असते, त्यामुळे त्या वस्त्रात एका सुतावाचून दुसरी गोष्ट नसते, त्याप्रमाणे समोर दिसणारी माणसे निरनिराळ्या आकाराची, रंगरुपाची, सुंदर, कुरूप, काळी, गोरी, उंच, बुटकी कशीही असली तरी त्याला सगळ्यांच्यातल्या ब्रह्मस्वरूपाचा प्रत्यय येत असल्याने तो सर्वांशी समबुद्धीने वागू शकतो. माउली पुढे अशा योगीराजाच्या आत्मिक शक्तीबद्दल सविस्तर सांगत आहेत. ते म्हणाले, असे योगी सर्व तीर्थांचा राजा म्हणजे तीर्थराज झालेले असतात. त्यांच्या दर्शनाने समाधान होते, त्यांची संगत जो करतो तो भरकटलेला असला तरी ब्रह्मपदास पोहोचतो. त्यांच्या बोलण्यावर धर्म जगतो कारण ते बोलतात ती धर्मवचने असतात.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​