नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीत २७ ऑगस्टला जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

सावंतवाडी / प्रतिनिधी : इन्सुली येथील विद्या विकास मंडळ संचलित नूतन माध्यमिक विद्यालयात माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर पुरस्कृत जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन दि. २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता करण्यात आले आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धा दोन गटांत होणार आहे. इयत्ता पहिली ते सातवी या गटासाठी ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘चांगला नागरिक कसा असावा?’ हे विषय देण्यात आले असून, भाषणासाठी चार मिनिटांचा कालावधी असेल. इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी ‘आजच्या युवकांसमोरील आव्हाने’ आणि ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : विद्यार्थ्यांसाठी संधी’ हे विषय निश्चित करण्यात आले असून, या गटासाठी सहा मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला २,००१ रुपये, द्वितीय क्रमांकाला १,५०१ रुपये, तृतीय क्रमांकाला १,००१ रुपये, तर दोन उत्तेजनार्थ पारितोषिके प्रत्येकी ५०१ रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय प्रथम तीन क्रमांकाच्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पारितोषिक प्रदान करण्यात येणार असून, सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या स्पर्धकांनाच सहभागाची संधी दिली जाणार आहे. प्रत्येक शाळेला प्रत्येक गटातून एकच स्पर्धक पाठविता येईल. स्पर्धकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरी व शिक्क्यासह प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या विषयांपैकी एका विषयावर भाषण करावे आणि त्याची हस्तलिखित प्रत परीक्षकांकडे सादर करावी. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
स्पर्धेसाठी इच्छुकांनी दि. २३ ऑगस्टपर्यंत मुख्याध्यापक एस. एम. शेवाळे, सहाय्यक शिक्षिका व्ही. व्ही. पालव, ए. पी. सावंत किंवा गुरुनाथ पेडणेकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९१४६२३७७४३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल.
Source link



