Uncategorized

सरकार स्थापनेची ‘मुहूर्त’घाई सुरू

प. बंगालमध्ये 9 मे रोजी तर आसाममध्ये 11 मे नंतर शपथविधी : तामिळनाडूत तिढा

 ► वृत्तसंस्था

चेन्नई, कोलकाता

विधानसभा निवडणुकांच्या निकालाअंती राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता चार राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात नवीन मुख्यमंत्री निवडण्याची आणि शपथविधीचा मुहूर्त निश्चित करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील भाजप सरकारचा शपथविधी सोहळा 9 मे रोजी सकाळी 10 वाजता कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राऊंडवर होणार आहे. तत्पूर्वी 8 मे रोजी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठरणार आहे. दुसरीकडे, भाजपने मोठा विजय मिळविलेल्या आसाममध्येही शपथविधीची जोरदार तयारी सुरू असून येथील सोहळा सोमवार, 11 मे नंतरच पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. तामिळनाडूमध्ये मात्र शपथविधी सोहळ्याचा तिढा निर्माण झाला आहे. ‘टीव्हीके’च्या करिष्म्यामुळे तामिळनाडूत सत्तापालट झाला आहे. येथे गुरुवार, 7 मे रोजी शपथविधी होईल अशी चर्चा आहे. मात्र, विजय थलपती यांनी सरकार स्थापनेचा दावा केला असला तरी 118 हा बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना यश आलेले नसल्याने शपथविधीचा मुहूर्त टळू शकतो.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचे निकाल 4 मे रोजी जाहीर झाले. आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये एनडीए पुन्हा सत्तेवर आली. पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये सरकार बदलले. तामिळनाडूमध्ये, विजय यांच्या दोन वर्षे जुन्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकून सर्वांना आश्चर्यचकित केले. 59 वर्षांत प्रथमच राज्यात डीएमके किंवा एआयएडीएमके शिवाय सरकार स्थापन होणार आहे. तामिळनाडूमध्ये, टीव्हीके प्रमुख विजय यांनी बुधवारी लोक भवनात राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा केला. यापूर्वी, एआयएडीएमके आणि काँग्रेसच्या नेत्यांनी वैयक्तिकरित्या आपला पाठिंबा जाहीर केला. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास, काँग्रेसच्या नेत्यांनी वैयक्तिकरित्या टीव्हीके कार्यालयाला भेट देऊन आपली पाठिंब्याची पत्रे सादर केली. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांना राज्यपालांकडून शपथविधीसाठी हिरवा कंदील दाखविण्यात आला नव्हता. ‘टीव्हीके’ सत्तास्थापनेसाठी घाई-गडबड करत असतानाच द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांचे संयुक्त सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चाही राज्यात सुरू आहे. दुसरीकडे केरळमध्ये सत्तेत आलेल्या काँग्रेसकडून मुख्यमंत्री ठरविण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी अद्याप कोणत्याही एका नावावर शिक्कामोर्तब झालेले दिसत नाही.

कोलकातामध्ये शनिवारी शपथविधी सोहळा

पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार स्थापन होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनी दिली. राज्यातील नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 9 मे रोजी होणार आहे. हा कार्यक्रम कोलकाताच्या प्रतिष्ठित ब्रिगेड परेड ग्राऊंडवर सकाळी 10 वाजता सुरू होईल. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पक्षाच्या सूत्रांनुसार, पंतप्रधान, एनडीए आणि भाजपचे सर्व मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नव्या मुख्यमंत्र्यांसोबतच 15 ते 20 मंत्रीही शपथ घेतील. नवीन मुख्यमंत्री निवडण्यासाठी होणाऱ्या पक्षाच्या विधिमंडळ बैठकीसाठी गृहमंत्री अमित शाह यांची मुख्य केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रचंड विजयाचे शिल्पकार मानले जाणारे शाह यांच्यासोबत ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी सह-निरीक्षक म्हणून असतील. सूत्रांनुसार, निवडणुकीदरम्यान पक्षाचा चेहरा असलेले सुवेंदू अधिकारी नवे मुख्यमंत्री होऊ शकतात. विधिमंडळ पक्षाची बैठक शुक्रवारी होण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये पुढील आठवड्यात सरकार स्थापन होणार

आसाममध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आसाममध्ये शपथविधी सोहळा 11 मे नंतर होईल, असे हिमंता बिस्वा सरमा यांनी सांगितले. राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर, आसामचे प्रभारी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी माध्यमांशी संवाद साधला. नवीन सरकारचा शपथविधी सोहळा 11 मे नंतर होईल, कारण आम्ही पंतप्रधानांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे, असे ते म्हणाले. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) अनुराग गोयल यांनी बुधवारी विधानसभा निवडणुकीचे अधिकृत निकाल राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्याकडे सादर केले. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाने गुवाहाटी येथील लोक भवनात राज्यपालांची भेट घेऊन निवडून आलेल्या आमदारांची यादी सादर केली. आता, नवीन सरकार स्थापन करण्याची घटनात्मक प्रक्रिया पुढे जाईल.


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​