Uncategorized

दिल्लीत घोंघावले संजू सॅमसनचे वादळ

चेन्नई सुपर किंग्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 8 गड्यांनी विजय, सामनावीर सॅमसनची कार्तिक शर्मासमवेत शतकी भागिदारी

वृत्तसंस्था, दिल्ली

2026 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात सामनावीर संजू सॅमसनच्या वादळासमोर यजमान दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्याच मैदानावर धुव्वा उडाला. चेन्नई सुपर किंग्जने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 15 चेंडू बाकी ठेवून 8 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे चेन्नई सुपर किंग्जने 10 सामन्यांतून 10 गुणांसह सहावे स्थान मिळविले असून दिल्ली कॅपिटल्स 10 सामन्यांतून 8 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केल्याने दिल्ली कॅपिटल्सला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. निशांका आणि केएल राहुल यांनी 24 चेंडूत 29 धावांची भागिदारी केली. चेन्नईच्या मुकेश चौधरीने निशांकाला झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारांसह 19 धावा जमविल्या. अकिल हुसेनने केएल राहुलला गायकवाडकडे झेल देण्यास भाग पाडले. त्याने 13 चेंडूत 2 चौकारांसह 12 धावा जमविल्या. फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत असलेला करुण नायर नूर अहमदच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 चौकारांसह 13 धावा जमविल्या. नितीश राणाने 13 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. नूर अहमदने त्याला कार्तिक शर्माकरवी झेलबाद केले. गुरजपनीत सिंगने कर्णधार अक्षर पटेलला केवळ 2 धावांवर बाद केले. दिल्ली कॅपिटल्सची यावेळी स्थिती 11 षटकांत 5 बाद 69 अशी केविलवाणी होती.

स्टब्स आणि समीर रिझवी यांनी संघाचा डाव बऱ्यापैकी सावरताना सहाव्या गड्यासाठी 47 चेंडूत 65 धावांची भागिदारी केल्याने दिल्ली कॅपिटल्सला 150 धावांचा टप्पा ओलांडता आला. स्टब्सने 31 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 38 धावा जमविल्या. ओव्हरटनने त्याला झेलबाद केले. आशुतोष शर्माने केवळ 5 चेंडूत 2 षटकारासह 14 धावा जमविल्या. एकेरी धाव घेण्याच्या नादात तो धावचीत झाला. समीर रिझवीने शेवटच्या चेंडूवर षटकार मारल्याने दिल्लीला 150 धावांचा टप्पा गाठता आला. रिझवीने 24 चेंडूत 4 षटकारांसह नाबाद 40 धावा झळकविल्या. दिल्ली कॅपिटल्सच्या डावात 9 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्फे नूर अहमदने 2 तर अकिल हुसेन, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग आणि ओव्हरटन यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. दिल्ली कॅपिटल्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकांत 37 धावा जमविताना 2 गडी गमविले. स्टब्स आणि समीर रिझवी यांनी 39 चेंडूत अर्धशतकी भागिदारी नोंदविली.

प्रत्युत्तरादाखल खेळताना संजू सॅमसनच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने 17.3 षटकांत 2 बाद 159 धावा जमवित स्पर्धेतील आपला पाचवा विजय नोंदविला. संजू सॅमसन आणि कर्णधार गायकवाड यांनी डावाला सावध सुरूवात करुन देताना 23 चेंडूत 24 धावांची भागिदारी केली. एन्गिडीच्या गोलंदाजीवर गायकवाड रिझवीकरवी झेलबाद झाला. त्याने 1 चौकारासह 6 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेलने उर्विल पटेलला राहुलकरवी यष्टीचीत केले. त्याने 9 चेंडूत 2 षटकारांसह 17 धावा जमविल्या. चेन्नईची स्थिती यावेळी 6.3 षटकांत 2 बाद 45 अशी होती.

शतकी भागिदारी

संजू सॅमसन आणि कार्तिक शर्मा यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 135 धावांची शतकी भागिदारी करत आपल्या संघाला दमदार विजय मिळवून दिला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी शतकी भागिदारी केवळ 60 चेंडूत नोंदविली. सॅमसनने केवळ 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह अर्धशतक झळकविले. या स्पर्धेतील सॅमसनचे हे तिसरे अर्धशतक आहे. सॅमसनने यापूर्वी एक शतकही झळकविले आहे. संजू सॅमसनने 52 चेंडूत 6 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 87 तर कार्तिक शर्माने 31 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 41 धावा झळकविल्या. दिल्लीतर्फे अक्षर पटेल आणि एन्गिडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 7 बाद 155 (समीर रिझवी नाबाद 40, स्टब्स 38, निशांका 19, केएल राहुल 12, नितीश राणा 15, करुण नायर 13, आशुतोष शर्मा 14, अवांतर 2, नूर अहमद 2-22, अकिल हुसेन, मुकेश चौधरी, गुरजपनीत सिंग आणि ओव्हरटन प्रत्येकी 1 बळी), चेन्नई सुपर किंग्ज 17.3 षटकांत 2 बाद 159 (संजू सॅमसन नाबाद 87, गायकवाड 6, उर्विल पटेल 17, कार्तिक शर्मा नाबाद 41, अवांतर 8, अक्षर पटेल, एन्गिडी प्रत्येकी 1 बळी).


Source link

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

सर्व जनतेला सरकारी योजना, नोकरी, नवीन स्टार्टअप माहिती आपल्या मोबाइल वर हवी असेल तर खालील फॉर्म सबमिट करा.​