योगारूढ माणसाच्या मनाला सुखदु:खांनी धक्के दिले तरी ते जागे होत नाही

अध्याय सहावा
ब्रह्मप्राप्ती व्हावी अशी इच्छा असलेल्या मुनीने त्यासाठी कर्म हे साधन आहे हे लक्षात ठेवावे. ज्याला ब्रह्मप्राप्त होईल त्याला तेथे स्थिर होण्यासाठी शम हे साधन सांगितले आहे. योगरूपी पर्वताच्या शिखरावर ज्या कोणास जाऊन पोहोचावयाचे असेल त्याने कर्मरूपी पायऱ्या चुकवू नयेत. कर्ममार्गाने जाणारा, यमनियमरूपी टप्प्यावरून आसनाच्या पायवाटेवर येतो आणि मग प्राणायामाच्या कड्याने योगरूपी डोंगराच्या मध्यभागावर पोहोचतो. पुढील चढण आणखीनच बिकट होत जाते. त्यातच नंतर प्रत्याहाररूपी तुटलेला कडा लागतो. प्रत्याहाररुपी कड्याची चढण खडी असल्याने त्यात हात वारंवार घसरतात ते टाळण्यासाठी वैराग्यरुपी नख्या त्यात रुतवाव्यात. वैराग्य म्हणजे अमुक एक घडावे किंवा अमुक एक घडू नये असे न वाटणे.
माणसाला नेहमीच आपल्याला अनुकूल ते घडावे आणि प्रतिकूल ते घडू नये असे वाटत असते आणि त्याविरुद्ध घडलं तर काय करायचं ह्या विवंचनेत तो असतो. त्यामुळे तो अस्वस्थ असतो. ज्याला आपण वैराग्यपूर्ण व्हायचं आहे अशी इच्छा असते त्याने कायम अशी धारणा म्हणजे मनाची पक्की समजूत ठेवावी की, जे घडेल ते घडूदेत कारण ते ईश्वरी इच्छेनुसार घडणार असल्याने आणि ईश्वर माझे हित करणारा असल्याने जे घडेल ते माझ्या भल्याचेच असणार आहे. ही धारणा जसजशी पक्की होत जाईल तसतसे त्याचे वैराग्य तीव्र होत जाईल. वैराग्याच्या तीव्रतेमुळे मनुष्य प्रत्याहाररुपी कड्याला घोरपडीसारखा चिकटून राहील. ज्ञानेन्द्राrयांवर त्याचा पूर्ण ताबा आला की, तो प्रत्याहाररुपी कडा चढून जाईल. ह्यासाठी प्राण व अपान या वायूंच्या वाहनावरून येऊन धारणेच्या प्रशस्त रस्त्याने ध्यानरूपी शिखर मागे टाकेपर्यंत साधक प्रयत्न करत राहतो. धारणामार्गाची चाल पुरी होऊन अमूक एक गोष्ट करायची आहे अशी इच्छा होणे बंद पडते. ह्या अवस्थेमध्ये ब्रह्मैक्य झाल्यामुळे साध्य व साधन यातील भेद नाहीसा होतो. साधकाच्या मनात पुढील विचार येत नसल्याने तो स्वस्थ बसू शकतो आणि त्याला मागील कशाचेही स्मरण होत नसते. अशा ऐक्याच्या भूमिकेवर त्याची समाधी लागते. या उपायांनी योगनिष्णात झाल्याने तो अखंड परिपूर्ण होतो, त्या योगारूढ झालेल्या योग्याची चिन्हे भगवंत पुढील श्लोकात स्पष्ट करून सांगत आहेत.
भगवंत म्हणाले, जो विषय आणि कर्माचे ठिकाणी आसक्त होत नाही आणि जो सर्व कर्मफलाच्या इच्छेचा त्याग करतो त्याला योगारूढ असे म्हणतात.
कर्मात जो अनासक्त विरक्त विषयी असे। संकल्प सुटले तेंव्हा तो योगारूढ बोलिला ।। 4 ।।
केलेल्या कर्माच्या फळात ज्याचे मन गुंतलेले नसते त्याला केलेल्या कर्माचा डांगोरा पिटून लोकांनी आपली वाहव्वा करावी, आपण काही विशेष केले आहे असे म्हणावे अशी कोणतीही अपेक्षा नसते. केलेल्या कर्माच्या फळाच्या रुपात आपल्याला काही विषय भोगायला मिळावेत असेही त्याला वाटत नसते म्हणून माउली श्लोकाच्या विवरणात म्हणतात, ज्याच्या इंद्रियरूपी घरात विषयांचे जाणे येणे होत नाही, तो आत्मज्ञानरूपी विश्रांतीच्या खोलीत स्वस्थ पडलेला असतो. सामान्याचे मन प्राप्त झालेल्या सुखदु:खाने हेलकावे खात असते.
Source link



