पश्चिम बंगालमधील प्रचारतोफा थंडावल्या – Tarun Bharat

विधानसभेच्या 142 जागांसाठी उद्या मतदान : अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी ‘रण’ गाजवले
वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालमध्ये 142 विधानसभा जागांसाठी मतदानाचा दुसरा टप्पा बुधवार, 29 एप्रिल रोजी होणार आहे. सोमवार हा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस होता. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांनी निवडणुकीचे ‘रण’ गाजवत जोरदार प्रचार केला. भाजप आणि टीएमसीसह सर्व राजकीय पक्षांनी प्रचारात आपली पूर्ण ताकद लावल्याचे दिसून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सोमवारी आपल्या सभेमध्ये भाजपला निवडून देण्याची आर्त हाक बंगाली जनतेला दिली. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पूर्ण तयारी केली आहे.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सोमवारी बॅरकपूरमध्ये निवडणूक सभेला संबोधित केले. तर अमित शाह यांनी पश्चिम बेहाला येथे रोड शो केला. तसेच, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजप उमेदवारांच्या समर्थनार्थ उत्तर 24 परगणा येथे रोड शो केला. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही निवडणूक सभांमधून आपल्या सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचत कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आर्जव केले. दुसरीकडे, ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही ममता बॅनर्जी यांच्या समर्थनार्थ दौरा केला. दरम्यान, पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिह्यातील एका प्राथमिक शाळेजवळून आठ जिवंत बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत. बॉम्ब सापडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हे बॉम्ब उत्तर 24 परगणा जिह्यातील हरबर्ना परिसरातून जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
भय नकोय, भाजप हवाय!
पंतप्रधान मोदींचा बंगाली जनतेशी पत्ररुपी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभांच्या माध्यमातून निवडणूक प्रचारात सहभाग घेतानाच निवडणूक प्रचार संपण्यापूर्वी बंगालच्या जनतेला बंगाली भाषेत एक पत्र लिहिले आहे. त्यांनी हे पत्र सोशल मीडियावर शेअर केले. या पोस्टमध्ये त्यांनी पश्चिम बंगालमधील संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रचंड प्रेमाने आणि आशीर्वादाने त्यांच्यात नवी ऊर्जा संचारल्याचे म्हटले आहे. या निवडणुकीदरम्यान मला बंगालमध्ये एक वेगळीच ऊर्जा जाणवली. प्रचंड उष्णता आणि इतक्या सभा असूनही, बंगालमधील या निवडणुकीदरम्यान मला अजिबात थकवा जाणवला नाही. या सभा आणि रोड शो माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखे होते. येथील लोकांना आता ‘भय नकोय तर भाजप हवाय’ असेच दिसून आले. तरुण असोत वा महिला, आपले शेतकरी बंधू-भगिनी, मजूर असोत वा व्यावसायिक, प्रत्येकजण ‘विकसित बंगाल’साठी पूर्णपणे समर्पित आहे, अशा भावना पंतप्रधानांनी आपल्या बंगाली भाषेतील पत्रात व्यक्त केल्या आहेत.
तृणमूल खासदाराच्या वाहनावर हल्ला
मिताली बाग यांच्यासह चालक जखमी : भाजप समर्थकांवर आरोप
पश्चिम बंगालमधील हुगळी येथे सोमवारी टीएमसी खासदार मिताली बाग यांच्या गाडीवर हल्ला झाला. भाजप समर्थकांनी गोघाटमध्ये त्यांच्या गाडीवर विटा, दगड आणि काठ्यांनी हल्ला केल्याचा आरोप टीएमसीने केला आहे. अभिषेक बॅनर्जी यांच्या रोडशोमध्ये सहभागी होण्यासाठी मिताली बाग गोघाटहून आरामबागकडे जात असताना हा हल्ला झाला. या हल्ल्यात गाडीच्या काचा फुटल्या असून खासदार आणि त्याचा चालक जखमी झाला. दोघांनाही आरामबाग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यासंबंधीची माहिती खासदार मिताली बाग यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून दिली. वाहनावरील दगडफेकीनंतर मिताली बाग कॅमेऱ्यासमोर रडल्या. व्हिडिओमध्ये त्या ‘माझ्या गाडीची अवस्था बघा. त्यांनी मोठे दगड फेकले. मी कशीबशी तिथून निसटले.’ असे म्हणताना दिसत आहेत. गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशामुळेच आपल्यावर हा हल्ला झाल्याचा दावाही त्यांनी केला. भाजपच्या पराभवाच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली असल्याचा आरोपही टीएमसीने केला आहे.
Source link



